Type Here to Get Search Results !

दुबईत मृत्यू झालेल्या तरुणाचे पार्थिव गावात; मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाने शक्य झाले मायदेशी आगमन

किनवट,दि.१२: तेलंगणा सीमेवरील अतिदुर्गम अप्पारावपेठ (ता. किनवट) या गावातील एका गरीब शेतमजूर कुटुंबावर मोठे संकट कोसळले. रोजगाराच्या शोधात काही महिन्यांपूर्वी दुबईला गेलेल्या श्याम यादगिरी अंगरवार (वय २७) या तरुणाचा आजाराने दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण गावात शोककळा पसरली. सदर घटनेची माहिती मिळताच अप्पारावपेठ येथील माजी जि.प. सदस्य सूर्यकांत अरंडकर यांनी तात्काळ आमदार भीमराव केराम यांच्याकडे धाव घेतली व मृतदेह मायदेशी आणण्यासाठी मदत मागितली. या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार केराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून या गरीब कुटुंबाची व्यथा मांडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्वतः परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला. त्यांच्या दिल्लीतील स्वीय सहाय्यक मनोज मुंडे यांना तातडीने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच अनुसूचित जनजाती आयोगाचे वरिष्ठ अन्वेषक गोवर्धन मुंडे यांना परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनाही समन्वयासाठी निर्देश देण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे आणि गोवर्धन मुंडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अवघ्या काही दिवसांत दुबईहून मृतदेह मायदेशी आणण्यात यश आले. सर्व खर्च मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः उचलला. १२ ऑक्टोबर रोजी श्याम अंगरवार यांचे पार्थिव त्यांच्या जन्मगावी अप्पारावपेठ येथे पोहोचले. ग्रामस्थ, नातेवाईक व सामाजिक बांधवांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. या प्रसंगी ग्रामस्थांनी अश्रू अनावर होत संवेदनशील मुख्यमंत्र्यांसह आमदार भीमराव केराम, गोवर्धन मुंडे, सूर्यकांत अरंडकर आणि स्थानिक सरपंच अब्दुल रब यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Post a Comment

0 Comments