नांदेड,दि.११: सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नांदेड संचलित सप्तरंगी साहित्य मंडळ, महाराष्ट्र यांच्या वतीने “काव्यपौर्णिमा : १००” हा बहुप्रतिक्षित साहित्यिक सोहळा रविवार, दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता हॉटेल विसावा पॅलेस, शिवाजीनगर, नांदेड येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद ज्येष्ठ कवी व साहित्यिक मा. रविचंद्र हडसनकर भूषवणार असून, उद्घाटन सुप्रसिद्ध उद्योजक व मसाप नांदेड जिल्हाध्यक्ष मा. बालाजी ईबितदार यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून मा. प्रल्हाद हिंगोले (आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक) तर निमंत्रक म्हणून मा. अजय एडके (सामाजिक कार्यकर्ते) उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. एस. जी. माचनवार (राष्ट्रीय नेते, बीपीएसएस) आणि मा. बालाजी थोटवे (प्रदेशाध्यक्ष, लसाकम) हे मान्यवर उपस्थित राहतील. या उपक्रमाचे संकल्पक म्हणून समीक्षक मा. प्रज्ञाधर ढवळे यांनी पुढाकार घेतला आहे.
पहिल्या सत्रानंतर, कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून मा. प्रा. डॉ. हेमंत सोनकांबळे (किनवट) मार्गदर्शन करतील. या सत्रात विविध कवी-कवयित्रींची साहित्यमेळणी रंगणार आहे. त्यानंतर दुपारी १:३० वाजता शैलेजा लोणे यांची एकांकिका सादर केली जाईल.
तिसऱ्या सत्रात, दुपारी २:३० वाजता, ज्येष्ठ कवी अनुरत्न वाघमारे अध्यक्षस्थानी असलेल्या दुसऱ्या कविसंमेलनात साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.
समारोप सत्र दुपारी ४:३० वाजता होणार असून, या दिवसभराच्या कार्यक्रमाला सप्तरंगी साहित्य मंडळ, महाराष्ट्र विनम्र यजमानत्व देणार आहे.
कविता, विचार आणि सर्जनशीलतेचा सोहळा : “काव्यपौर्णिमा १००” नांदेडच्या साहित्यविश्वाला नवसंजीवनी देईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
“काव्यपौर्णिमा : १००” : नांदेडमध्ये साहित्यसुगंधाने दरवळणार काव्यसंध्या
byLokaawaj
-
0