"सातबारा कोरा करा, नाहीतर महाराष्ट्र ठप्प!" : किनवटात किसान सभेचा इशारा

 किनवट,दि: नागपूर येथे सुरू असलेल्या राज्यव्यापी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आज(दि



.३०)तहसील कार्यालयावर किसान सभेच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला. या वेळी शेकडो शेतकऱ्यांनी "सातबारा कोरा करा, नाहीतर महाराष्ट्र ठप्प करू!" अशा घोषणांनी तहसील परिसर दणाणून सोडला.

चौकट:
"सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, अन्यथा महाराष्ट्र ठप्प पाडू!"
— कॉ. अर्जुन आडे, राज्य उपाध्यक्ष, किसान सभा

शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वात २८ ऑक्टोबरपासून नागपूर येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला  तालुक्यातील किसान सभेने पाठिंबा दर्शविला. तहसीलदारांना निवेदन देऊन शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांसाठीच्या विविध मागण्यांचा पुन्हा उच्चार करण्यात आला.

मागण्यांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून सातबारा कोरा करणे, हमीभावाचा कायदा लागू करणे, अतिवृष्टीग्रस्तांना हेक्‍टरी ५० हजार रुपये मदत, तसेच दिव्यांग व निराधारांना सहा हजार रुपये पेन्शन देणे, या प्रमुख मागण्यांचा समावेश होता.

या मागण्यांवर अद्याप राज्य सरकारकडून ठोस भूमिका घेण्यात आलेली नसल्याने शेतकरी वर्गामध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. अर्जुन आडे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कर्जमुक्तीची घोषणा न केल्यास किनवट-माहूरसह जिल्हाभरात रेल्वे रोको, रस्ता रोको आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला.

या वेळी किसान सभेचे जनार्दन काळे, शेषराव ढोले, देविदास जाधव, सुदाम बर्गे, उत्तम वाघमारे, शेख चांद, बाबा कार्पेंटर, नंदू मोधुकवार, शैलीया आडे, अजय राठोड, जांबवंत जानगेवाड, राजू केंद्रे, घूमन्ना पुरेवार, वसंत राठोड आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp