किनवट,दि.२३: राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील महिलांचे व बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी पूर्वी प्रभावीपणे राबविण्यात आलेल्या “मानव विकास कार्यक्रम” पुन्हा सुरू करण्याची मागणी राज्यस्तरीय गाभा समितीचे सदस्य डॉ. अशोक बेलखोडे यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना नुकत्याच पाठविलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, या योजनेमुळे ग्रामीण भागात दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध होत होत्या. विशेषतः आदिवासी व मागास भागातील गरोदर मातांच्या आरोग्य तपासणी, औषधोपचार, सोनोग्राफी, निदान सेवा, कुपोषित बालकांवरील उपचार आणि अतिजोखीमीच्या मातांची लवकर ओळख यात या योजनेचा मोठा हातभार होता.
या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागात घरगुती प्रसुती कमी होऊन संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण तब्बल ९८ टक्क्यांपर्यंत वाढले होते. परिणामी मातामृत्यू दर आणि कुपोषणातही घट झाली, असे डॉ. बेलखोडे यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
मात्र, अलीकडच्या काळात या प्रकल्पात अनेक त्रुटी आढळत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. “नियमित शिबीरे न होणे, वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून खाजगी डॉक्टरांची नियुक्ती, गरोदर स्त्रियांची अपुरी तपासणी, आशा वर्करकडून खाजगी दवाखान्यांकडे रुग्णांचा कल वाढविणे अशा अनेक बाबींमुळे कार्यक्रमाची गुणवत्ता घसरली आहे,” असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या योजनेचा उद्देश व परिणाम दोन्ही अत्यंत सकारात्मक असल्याने ती बंद करण्याऐवजी पुनरावलोकन करून सुधारित पद्धतीने पुन्हा सुरू करावी, अशी मागणी डॉ. बेलखोडे यांनी केली आहे. “सशक्त माताच सुदृढ बालकाला जन्म देते, हे लक्षात घेऊन शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा,” असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रधान सचिव (आरोग्य व कुटुंब कल्याण) आणि राज्यस्तरीय गाभा समिती अध्यक्ष व सदस्य यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Post a Comment
0 Comments