किनवट,दि.८: अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही शासनाकडून पुरेशी मदत मिळाली नाही. शासनाच्या या निष्क्रियतेविरोधात शिवसेनेतर्फे ‘ढोल वाजवा’ आंदोलन छेडण्यात आले. किनवट तहसील कार्यालयासमोर आज सकाळी झालेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी ढोल-ताशांच्या गजरात सरकारला जागे करण्याचा इशारा दिला.
या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख (ग्रामीण) नांदेड ज्योतीबा जयराम खराटे यांनी केले. यावेळी बबनराव थोरात, अनिल रुणवाल, मारोती दिवसे पाटील,ॲड. यश खराटे, जितू चोले, प्रशांत कोरडे, शहर संघटक किशोर बोलेनवार, तसेच युवा सेना तालुका प्रमुख अतुल दर्शनवाड उपस्थित होते.
“कर्जमुक्तीशिवाय पर्याय नाही” : खराटे
“निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीची आश्वासने दिली जातात, पण सत्तेत आल्यानंतर ती वचने पाळली जात नाहीत. फक्त आश्वासनांनी आता भागणार नाही, ठोस कृती हवी,” असा इशारा ज्योतीबा खराटे यांनी दिला.
ते म्हणाले, “शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले, तर शिवसेना रस्त्यावर उतरून राज्यभर ‘ढोल वाजवा’ आंदोलन अधिक तीव्र करेल.”
Tags
महाराष्ट्र
