Type Here to Get Search Results !

गोकुंदा गटात मुस्लिम समाजाचे वाढते राजकीय अस्तित्व : प्रतिनिधित्वाच्या मागणीला वेग


 





किनवट :  तालुक्यातील गोकुंदा जिल्हा परिषद गट हा एकमेव खुल्या प्रवर्गातील गट असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तो सध्या चर्चेचा प्रमुख विषय ठरला आहे. या गटातून मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांतून जोर धरू लागली आहे.

गोकुंदा शहरासह जिल्हा परिषद गटातील सामाजिक आणि राजकीय समीकरणांचा विचार करता, मुस्लिम समाजाचे मतदान या भागात प्रभावी मानले जाते. सुमारे नऊ हजारांहून अधिक मतदारसंख्या असलेल्या या समाजाचे राजकीय अस्तित्व दुर्लक्षित राहिल्याची भावना स्थानिक पातळीवर तीव्र होत आहे.

या गटातील दोन्ही पंचायत समिती गण — मांडवा गण व गोकुंदा गण  हे अनुक्रमे अनुसूचित जमाती व अनुसूचित जातींसाठी आरक्षित असल्याने मुस्लिम समाजातील इच्छुकांना निवडणूक लढविण्याची संधी नाकारली गेली. त्यामुळे जिल्हा परिषद गोकुंदा गटातील खुली जागा ही मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्वाची सुवर्णसंधी म्हणून पाहिली जात आहे.


• सर्व प्रमुख पक्षांत हालचालींना वेग

भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या प्रमुख पक्षांत मुस्लिम कार्यकर्त्यांची हालचाल वाढली आहे. या व्यतिरिक्त, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी आणि इतर प्रादेशिक पक्षांनी देखील गोकुंदा गटात संघटनात्मक तयारी सुरू केली आहे.

काही नेते मुस्लिम समाजातून उमेदवार देण्याच्या बाजूने ठाम आहेत, तर काहीजण या समाजाच्या मतांचा वापर केवळ निवडणूकपुरता न राहावा, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.


• उमेदवारीवर सर्वांचे लक्ष

आगामी आठवड्यांत विविध पक्षांच्या महत्त्वाच्या बैठका होणार असून, या बैठकीत गोकुंदा गटातील उमेदवार निवडीबाबत निर्णायक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाला खऱ्या अर्थाने राजकीय प्रतिनिधित्व मिळते का, हा प्रश्न सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

गोकुंदा मतदारसंघातील सामाजिक समतोल, मुस्लिम समाजाचे प्रभावी मतदान, आणि राजकीय पक्षांच्या उमेदवार निवड प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत कोणता पक्ष या समाजाला प्रतिनिधित्व देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.





Post a Comment

0 Comments