किनवट : नांदेड,–भोकर–हिमा
जिल्ह्यातील किनवट व माहूर हे तालुके जिल्हा मुख्यालयापासून तब्बल १५० ते २०० किलोमीटर अंतरावर असून या भागात दळणवळणाच्या सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वेळेवर पोहोचता न येणे, अपुऱ्या गाड्यांचा त्रास, तसेच एसटी सेवांची कमतरता या कारणांमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
सध्या या मार्गावर केवळ दोन पॅसेंजर व दोन एक्सप्रेस रेल्वे गाड्या चालतात, मात्र त्या अवेळी व प्रवाशांसाठी गैरसोयीच्या वेळेत धावतात. त्यामुळे जिल्हा मुख्यालयावर कामानिमित्त जाणारे प्रवासी एका दिवसात जाऊन येऊ शकत नाहीत. परिणामी नागरिकांचा अमूल्य वेळ व पैसा वाया जातो.
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) केवळ दोनच बसेस या मार्गावर धावत असल्याने प्रवाशांचा त्रास अधिकच वाढला आहे. चालू असलेल्या रेल्वे गाड्याही नेहमी वेळेवर चालत नाहीत कधी मालटेकडी, तर कधी मुदखेडपर्यंतच धावतात. उदाहरणार्थ, आदिलाबाद–नांदेड इंटरसिटी एक्सप्रेस गाडी अनेकदा मध्येच थांबवली जाते, ज्यामुळे प्रवाशांचे नियोजन कोलमडते.
पूर्वी नांदेड–नागपूरदरम्यान ‘नंदिग्राम एक्सप्रेस’ ही नियमित सेवा होती; मात्र कोरोनानंतर ती बंद झाली. त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नातून या गाडीला बल्लारशापर्यंत वाढवण्यात आले. परंतु किनवट, माहूर, हिमायतनगर व भोकर परिसरातील प्रवाशांचा बल्लारशा येथे कोणताही संबंध नसल्याने ही सेवा स्थानिकांसाठी निरुपयोगी ठरली आहे.
प्रवाशांच्या मते, राज्याची उपराजधानी असलेले नागपूर हे शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि प्रशासनाचे महत्त्वाचे केंद्र आहे. तेथे एम्स रुग्णालय, दिक्षाभूमी, विमानतळ, तसेच उत्तर भारतासाठी रेल्वे जोडणी असल्याने नागपूरमार्गे प्रवास करणे अधिक सोयीचे ठरते.
Post a Comment
0 Comments