मुंबई : राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामांकन प्रक्रिया आता अधिक सुलभ झाली आहे. ऑनलाईन नामनिर्देशनामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींचा विचार करून राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. ऑनलाईनसोबतच पारंपरिक पद्धतीने म्हणजेच ऑफलाईन फॉर्म स्वीकारण्यासही परवानगी देण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी (दि.१४ नोव्हेंबर) जारी केलेल्या आदेशानुसार, १५ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना दोन्ही मार्गाने नामांकनपत्रे दाखल करता येणार आहेत. विशेष म्हणजे रविवार, १६ नोव्हेंबर या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीदेखील फॉर्म स्वीकारले जाणार आहेत.
ऑनलाईन प्रणालीवर वाढलेल्या तांत्रिक अडचणी, तसेच शेवटच्या दिवसांत वाढणारी गर्दी लक्षात घेऊन उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोगाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी तसेच पोलीस विभागाला आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.
उमेदवारांसाठी हा निर्णय मोठा दिलासा मानला जात असून, नामांकन प्रक्रिया सुरळीत पार पडण्यास यामुळे मदत होणार आहे.
Post a Comment
0 Comments