किनवट,दि.१८ : नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तापू लागली आहे. शहरातील राजकीय पारडे वेगाने हलू लागलेल्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांनी आपापले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अधिकृतरित्या जाहीर केल्यानंतर किनवटच्या राजकारणाला नवा कलाटणी मिळाली आहे.
महायुतीकडून पुष्पा आनंद मच्छेवार, तर महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सुजाता एन्ड्रलवार यांना उमेदवारी जाहीर होताच राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे. महिला राखीव असलेल्या या जागेसाठी एन्ड्रलवार यांची निवड ‘विश्वासू, सेवाभावी आणि अनुभवी’ चेहरा म्हणून शहरात पाहिली जात आहे. माजी जिल्हा परिषद सदस्या म्हणून त्यांचा अनुभव, कोरोनाकाळातील त्यांचे कार्य, तसेच तरुणांमधील त्यांची लोकप्रियता यामुळे या उमेदवारीला वेगळीच धार मिळाली आहे. विशेष म्हणजे, लोकप्रिय युवा नेतृत्व करण एन्ड्रलवार यांनी स्वतः निवडणूक न लढवता आपल्या मातोश्रींना पुढे केल्याने आघाडीत नवचैतन्य संचारले आहे.
दुसऱ्या बाजूला, महायुतीच्या पुष्पा मच्छेवार या माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांच्या कार्याचा मजबूत वारसा घेऊन मैदानात उतरत आहेत. जलजीवन मिशनमधील घराघरांत पाणीपुरवठा, रस्ते काँक्रीटीकरण, प्रकाशयोजना, हिरवळीच्या बागा आणि नवीन बाजारपेठ या विकासकामांची छाप शहरवासीयांच्या मनात आजही ठळक आहे. या भक्कम विकासकामांच्या जोरावर महायुतीचा गट आत्मविश्वासात असून आ. भीमराव केराम यांचे मार्गदर्शनही त्यांना बळ देत आहे.
गत निवडणुकीपासून सात वर्षांत किनवटचे राजकीय गणित मोठ्या प्रमाणात बदलले आहे. नव्या पिढीचा वाढता प्रभाव, स्थानिक असंतोष, बदलते गटतट आणि संघटनात्मक हालचाली यंदाच्या निवडणुकीत अनपेक्षित वळणे घेऊ शकतात, अशी चिन्हे दिसत आहेत.
शहरात सध्या चर्चेचा एकच विषय आहे :
“ही निवडणूक व्यक्तींची नव्हे… ही निवडणूक विश्वास आणि विकासाची आहे!”
पुष्पा मच्छेवार विरुद्ध सुजाता एन्ड्रलवार असा थेट सामना निश्चित झाल्याने किनवटचे राजकीय तापमान आगामी दिवसांत आणखी वाढणार हे निश्चित आहे.

Post a Comment
0 Comments