Type Here to Get Search Results !

सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र कार्यान्वित; शेतकऱ्यांना नोंदणीसह कागदपत्रांची आवश्‍यकता : सभापती गजानन मुंडे


 किनवट : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या मार्गदर्शनानुसार किनवट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत चालू हंगामातील सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राची अधिकृत सुरूवात झाली आहे. प्रशासनाकडून सोयाबीनचा शासकीय हमीभाव प्रतिविंटल ५ हजार ३२८ रुपये निश्चित करण्यात आला असून, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपला माल बाजार समितीकडे आणावा, असे आवाहन सभापती गजानन मुंडे यांनी केले.

हमीभाव केंद्रावर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य असून, नोंदणी करताना ७/१२ उताऱ्यावर २०२५-२६ वर्षातील सोयाबीन पेराची नोंद असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आधार कार्ड, आधार-लिंक असलेले बँक पासबुक आणि अंगठ्याची नोंद (फिंगरप्रिंट) सादर करावी लागणार आहे.

शेतकऱ्यांना नोंदणी प्रक्रियेत अडचण येऊ नये म्हणून बाजार समितीत सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नोंदणी करताना शेतकऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती बंधनकारक असल्याचे समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सभापती गजानन मुंडे, उपसभापती राहुल नाईक, सचिव रवींद्र राठोड तसेच संचालक मंडळ सातत्याने प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रांसह बाजार समितीत येऊन नोंदणी करून हमीभावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments