Type Here to Get Search Results !

राशन दुकानदारांना पाच महिन्यांपासून कमिशन नाही दिवाळी सणही गेला आर्थिक अडचणीत

 किनवट,ता.२(बातमीदार) : शासनाच्या रास्त धान्य योजनेमुळे गरीब व गरजू कुटुंबांना दिलासा मिळतो, मात्र या योजनेशी थेट जोडलेले दुकानदारच सध्या अडचणीत सापडले आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून (जून ते ऑक्टोबर २०२५) किनवट तालुक्यातील एकाही रास्त धान्य दुकानदाराला मानधन मिळालेले नाही. परिणामी, सणासुदीच्या काळात दुकानदारांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट पसरले होते.

किनलट तालुक्यात २०१ रास्त धान्य दुकानदार कार्यरत असून, दरमहा हजारो क्विंटल धान्य वाटप केले जाते. दुकानदारांना धान्य वाटपासाठी मजूर ठेवावे लागतात, तसेच दुकानभाडे, वाहतूक व इतर खर्च भागवावे लागतात. मात्र, कमिशनची रक्कम न मिळाल्याने दुकानदारांची आर्थिक कंबर मोडली आहे.

“मागील पाच महिन्यांपासून कमिशन मिळालेले नाही. त्यामुळे आम्हा दुकानदारांसमोर जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतेही ठोस उत्तर मिळालेले नाही. दिवाळीच्या सणातही आम्ही आर्थिक संकटात होतो.”
— सुरेश कराड, अध्यक्ष, रास्त भाव धान्य दुकानदार संघटना, किनवट 

दरमहा प्रति क्विंटल १५० रुपयांचे कमिशन दुकानदारांना मिळते. या रकमेवरच त्यांचा व्यवसाय टिकून असतो. त्यामुळे कमिशन थकले गेल्याने अनेक दुकानदारांना कर्ज घेऊन उदरनिर्वाह करावा लागत आहे.

“दुकानदारांना कमिशन देण्यासाठी आवश्यक अनुदानाची मागणी करण्यात आली असून, तसा प्रस्ताव जिल्हा कार्यालयाकडे पाठविला आहे. अनुदान मिळताच कमिशनचे वाटप केले जाईल.”
— निलेश रोठोड, पुरवठा निरीक्षक अधिकारी, किनवट 

संघटनेच्या म्हणण्यानुसार, ही योजना गरिबांसाठी असली तरी दुकानदार हे त्या योजनेचे महत्त्वाचे माध्यम आहेत.कमिशन वेळेवर न मिळाल्यास दुकाने चालवणेच अवघड होते. त्यामुळे शासनाने दरमहा नियमितपणे कमिशन वितरीत करण्याची मागणी दुकानदारांकडून होत आहे.



Post a Comment

0 Comments