किनवट,दि .२१: पाच वर्षे मतदारांच्या डोळ्यात धूळफेक करून दिसेनासे झालेले काही उमेदवार, निवडणुकीची वेळ येताच अचानक साक्षात ‘लोकसेवक’ बनून गल्लोगल्ली फिरताना दिसत आहेत. ज्या चेहऱ्यांनी पाच वर्षे वॉर्डचे तोंडसुद्धा पाहिले नाही, तेच आता हात जोडून दारात उभे राहून "आमच्याकडे बघा" अशी याचना करत आहेत.
सत्तेत असताना विकासाचा मागमूसही नसताना, फेरफार, गुंठेवारी, लेआउट मंजुरी, इनामी जमिनी आणि फाईलवरून खेळल्या जाणाऱ्या पैशांच्या खेळामुळे नगरपरिषदेची सत्ता ही नफा कमावण्याची सोनेरी खाण बनल्याची चर्चा शहरभर पसरली आहे. या ‘उत्पन्न झऱ्या’वर ताबा मिळवण्यासाठीच यंदा उमेदवारीसाठी धावपळ, गटबाजी आणि पडद्यामागील व्यवहार अक्षरशः शिगेला पोचले.
जुन्या, कामकाजात शून्य कामगिरी असलेल्या चेहऱ्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आल्याने नव्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले तरी न धरणारी नाराजी स्पष्ट दिसत आहे. मतदारही यावेळी सावध असून, पाच वर्षे दिसलेही नाहीत आणि निवडणुकीत मात्र विकासाचा जप करणाऱ्यांना धडा शिकवण्याची मनस्थिती त्यांनी तयार केली आहे.
दरम्यान, उमेदवारी निश्चित होताच सर्वच पक्षाचे उमेदवार मतदारांच्या दारी अचानक अवतरले. पाच वर्षे रस्ते खड्ड्यांनी भरत असताना, नाल्या तुंबत असताना, शहर कचऱ्याने दरवळत असताना या ‘लोकप्रतिनिधी’ंची नजर कधीच त्या दिशेने वळली नव्हती. आणि आता मात्र तेच चेहरे प्रत्येक वॉर्डात “आम्ही तुमच्यासाठीच आहोत” अशी घोषवाक्ये देत केविलवाणी विनवणी करत आहेत.
परिस्थिती अशी की, नागरी समस्यांना पाच वर्षे सपशेल विसरलेले उमेदवार आता केवळ मतांच्या लालसेने ‘जनतेचे हितचिंतक’ बनले आहेत. पण यावेळी मतदारांचा मूड वेगळा आहे—
“काम नसेल तर वोट नाही!”
हा स्पष्ट संदेश शहरभर उमटू लागला आहे.
![]() |

Post a Comment
0 Comments