किनवट : शेतकऱ्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना आणि अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने बोधडी(ता .किनवट)येथे गुरुवारी (दि. २०) छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.
नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाई, कर्जमुक्ती, हमीभावाने तात्काळ खरेदी, पिक विमा लागू करणे, महत्त्वाच्या रस्त्यांची डागडुजी, तसेच तहसीलदार हकालपट्टीसह विविध मागण्यांवर संताप व्यक्त करण्यात आला. “शेअर मार्केटसाठी सरकारचे तत्पर धावते पाउल दिसते, परंतु शेतकऱ्यांच्या वेदनांकडे मात्र सातत्याने दुर्लक्ष!” असा आरोप शेतकरी संघटनेचे त्रिभुवनसिंह ठाकूर यांनी यावेळी केला.
गाव पातळीवर हमीभावाची प्रभावी अंमलबजावणी, किनवट–नांदेड महामार्गावरील ‘बोगस कामा’ची चौकशी, बोधडी परिसरातील मुख्य रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, पिक विमा योजना पुन्हा सुरू करणे, तसेच विमा न भरल्याच्या कारणावरून नुकसानभरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी मोर्चात जोरकसपणे मांडण्यात आली.
बोधडी सर्कल प्रमुख गजानन चव्हाण, अर्जुन आडे, रमेश कदम यांनीही शासनाच्या धोरणांवर सडकून टीका केली. स्थानिक अधिकाऱ्यांनी या आंदोलनाची दखल घेत निवेदन स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याने अखेर पोलिस निरीक्षक गणेश कराड यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सोपवण्यात आले.

Post a Comment
0 Comments