पटना (बिहार) : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-जेडीयू (एनडीए) युतीविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले आहे. पटना येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका करताना म्हटले की, “देशाचे संविधान वाचवायचे असेल, तर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि पेरियार स्वामी यांच्या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्यांनी एनडीएविरोधात मतदान करावे.”
ॲड. आंबेडकर म्हणाले, “आरएसएस-भाजपला देशाचे संविधान बदलायचे आहे. आम्ही कोणाला मतदान करावे हे सांगणार नाही, पण एनडीएविरोधात मतदान करणे हीच आज देशप्रेमाची खरी ओळख आहे.”
दरम्यान, त्यांनी रशियाकडून भारताने स्वस्तात घेतलेल्या कच्च्या तेलाच्या खरेदीवरून केंद्र सरकारवर तीव्र प्रहार केला. ते म्हणाले, “रशियाच्या स्वस्त तेलाचा फायदा भारत सरकारला न होता, अंबानींच्या रिलायन्स ऑईल आणि नायरा या खासगी कंपन्यांना होत आहे. जर हा फायदा सरकारला झाला असता आणि पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले असते, तर हे धोरण लोकहिताचे मानले गेले असते.”
आंबेडकर यांनी पुढे म्हटले की, भारत सरकारची ही आर्थिक नीती खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी आहे. “उद्या या कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उतरल्या, तर त्याचा फटका इतर देशांनाही बसू शकतो, आणि याच कारणामुळे भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे.”
‘ऑपरेशन सिंदूर’ आणि परराष्ट्र धोरणावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, “या मोहिमेनंतर अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, चीन आणि रशिया यांसारख्या मोठ्या देशांनी भारताला साथ दिली नाही. उलट पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेतली.”
शेवटी, त्यांनी पुन्हा एकदा आवाहन केले की, “जर देश वाचवायचा असेल, तर संविधानाचे रक्षण करणाऱ्यांनी एनडीएविरोधात मतदान करावे,” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट शब्दांत मांडली.

Post a Comment
0 Comments