किनवट : किनवट नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे अंतिम चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले असून नगराध्यक्षपदासाठी एकूण आठ उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत. खुल्या प्रवर्गातील महिला पदासाठी दाखल १५ अर्जांपैकी ७ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर ही लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. तसेच २१ नगरसेवक पदांसाठी पात्र ठरलेल्या १२२ उमेदवारांपैकी ३२ जणांनी अर्ज मागे घेतल्याने आता ९० उमेदवार चुरशीने निवडणूक लढवणार आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी दाखल उमेदवारांपैकी भाजपच्या दोन, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) प्रत्येकी एक, तसेच इतर तीन उमेदवारांनी माघार घेतली. माघार घेणाऱ्यांमध्ये खान अफरिदी सफिया जहीरुद्दीन खान, खान जरिना साजिद खान, नेम्मानीवार सुहासिनी श्रीनिवास, नेम्मानीवार अनुजा किरणकुमार, नेम्मानीवार रमा यादवराव, शेख नजमा सय्यद फकरोद्दीन आणि माहेजबीन अकबर यांचा समावेश आहे.
आता मुख्य लढत भाजपाच्या पुष्पा आनंद मच्छेवार आणि शिवसेना (उबाठा) च्या सुजाता विनोद एंड्रलवार यांच्यात होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. आठ उमेदवारांपैकी मुस्लिम समाजाच्या पाच महिला उमेदवारांचा समावेश असून त्यात काँग्रेसच्या शेख तय्यबा बेगम शेख खाजामियाँ, अब्दुल सुमय्या अंजुम अब्दुल मलिक, काजी राहत तबस्सुम काजी शफीउद्दीन, खान शबाना अखिल खान, शेख शाहेदा शेख शब्बीर यांचा समावेश आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातील मतविभाजनाची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे. याशिवाय सर्पे सूर्यकांता मिलिंद (माकप) यांनाही स्पर्धेत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
२ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ९० उमेदवार रिंगणात असलेल्या २१ जागांसाठी अनेक प्रभागांमध्ये दुरंगी आणि तिरंगी लढतीची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
प्रभागनिहाय उमेदवारांची संख्या
प्रभाग ०१ – अ (०२), ब (०४)
प्रभाग ०२ – अ (०६), ब (०५)
प्रभाग ०३ – अ (०४), ब (०५)
प्रभाग ०४ – अ (०९), ब (०६)
प्रभाग ०५ – अ (०३), ब (०२)
प्रभाग ०६ – अ (०३), ब (०५)
प्रभाग ७ – अ (०७), ब (०३)
प्रभाग ८ – अ (०२), ब (०२)
प्रभाग ९ – अ (०३), ब (०५)
प्रभाग १० – अ (०५), ब (०६), क (०३)