मुंबई : प्रसिद्ध मानवाधिकार वकील ॲड. असीम सरोदे यांच्या सनद निलंबनाच्या निर्णयाचा ऑल इंडिया लॉयर्स युनियन (AILU) ने तीव्र निषेध केला असून, हा निर्णय लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट हल्ला असल्याचे म्हटले आहे.
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा (BCMG) यांनी ॲड. सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी निलंबित केली आहे. हा निर्णय मार्च २०२४ मधील एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था व संवैधानिक पदाधिकाऱ्यांविषयी केलेल्या टिप्पण्यांवर आधारित असल्याचे समजते.
एआयएलयूने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “ॲड. सरोदे यांनी न्याय वितरण यंत्रणेतील विलंब, नागरिकांना न्याय मिळवण्यातील अडचणी आणि संवैधानिक पदाधिकाऱ्यांच्या जबाबदारीवर भाष्य केले. ही रचनात्मक आणि लोकशाही भावनेतून केलेली टिप्पणी होती. मात्र या विधानाचा विपर्यास करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.”
संघटनेने म्हटले आहे की, “ ॲड. सरोदे यांनी कोणताही शिस्तभंग किंवा अनैतिक वर्तन केलेले नाही. तरी भाजपाशी संबंधित व्यक्तीच्या तक्रारीवरून निलंबनासारखी कठोर शिक्षा देणे ही दडपशाही आहे.”
बार कौन्सिलने दिलेला आदेश १२ ऑगस्ट २०२५ रोजी दिला असला तरी ॲड. सरोदे यांना तो ३ नोव्हेंबरला कळवण्यात आला. या विलंबामुळे प्रक्रियात्मक आणि नैसर्गिक न्यायाचे उल्लंघन झाले आहे, असे एआयएलयूचे म्हणणे आहे.
संघटनेने पुढे म्हटले आहे की, देशात गेल्या काही महिन्यांत पत्रकार, लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांच्यावरही दडपशाही सुरू आहे. “लोकशाहीत विरोधी मत व्यक्त करणे हा गुन्हा नाही. न्यायव्यवस्थेवरील विश्वास टिकवण्यासाठी वकिलांना गप्प करण्याचे प्रयत्न थांबले पाहिजेत,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
एआयएलयूने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी निलंबनाचा आदेश त्वरित मागे घ्यावा आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया (BCI) ने हस्तक्षेप करून अनुशासनात्मक प्रक्रिया स्वतंत्र व पारदर्शक ठेवावी, अशी मागणी केली आहे.
“संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे. वकिलाला गप्प करण्याचा प्रयत्न म्हणजे न्यायव्यवस्थेलाच धोका आहे. अॅड. असीम सरोदे यांची सनद तत्काळ बहाल करण्यात यावी,” अशी ठाम भूमिका एआयएलयूने घेतली आहे. निवेदनावर ॲड. बाबासाहेब वावळकर, अध्यक्ष – AILU महाराष्ट्र व ॲड. चंद्रकांत बोजगर, सचिव – AILU महाराष्ट्र यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Post a Comment
0 Comments