Type Here to Get Search Results !

किनवट नगरपरिषद निवडणूक : तिकीट वाटपावरून राजकीय पक्षांत अंतर्गत बंडखोरी पेटली!

 किनवट : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची धामधूम सुरू असताना तिकीट वाटपाच्या प्रक्रियेनंतर प्रमुख पक्षांतील असंतोष शिगेला पोहोचला आहे. जुन्या, निष्ठावान आणि वर्षानुवर्षे पक्षासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या कार्यकर्त्यांना मागे सारत पक्षांतर करून अचानक उगवलेल्या ‘आयाराम’ उमेदवारांना प्राधान्य देण्यात आल्याने गटबाजी, नाराजी आणि धुसफूस उफाळून आली आहे.

तिकिटासाठी काहीही करू अशी भूमिका घेणाऱ्या, रात-दिवस राबत पक्षाचे अस्तित्व टिकवणाऱ्या कार्यकर्त्यांचे कष्ट आणि समर्पण दुर्लक्षित केल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये खोलवर घर करत आहे. “बेडूक उड्या मारून” शेवटच्या क्षणी आलेल्या उमेदवारांना तिकीट मिळताच जुन्या कार्यकर्त्यांच्या नाराजीला उधाण आले असून, पक्षांतर्गत वातावरण ढवळून निघाले आहे. कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, “पक्षाशी निष्ठा ठेवणाऱ्यांना मागे टाकून बाहेरून आलेल्यांना संधी देणे हा अन्याय” अशी चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.

आता पक्षाचे अधिकृत तिकीट मिळवलेल्या  नव्या उमेदवारांचीही खरी परीक्षा सुरू झाली आहे. प्रतिष्ठेची ही निवडणूक त्यांच्या सत्त्वाचे मूल्यमापन करणारी ठरणार असून, नाराज कार्यकर्त्यांना कसे समजावून घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment

0 Comments