किनवट नगरपरिषद निवडणूक : ईव्हीएम सीलिंग प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण; मतदानासाठी सर्व तयारी संपन्न

किनवट, दि.३० : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने मतदानासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून, ईव्हीएम (EVM Commissioning) ची तपासणी व सीलिंग प्रक्रिया शनिवारी पारदर्शकपणे पार पडली. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी नगरपरिषद कार्यालयात सर्व मशिन्सची पूर्तता करण्यात आली.

या प्रक्रियेला निवडणूक निरीक्षक उपजिल्हाधिकारी श्री. अनिल माचेवाड आणि निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती शारदा चोंडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यता देण्यात आली. सर्व उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्या समक्ष प्रत्येक मतदान केंद्रासाठीची ईव्हीएम मशिन्स तयार करून सील करण्यात आल्या. मशिन्स सील केल्यानंतर त्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या.

उमेदवार व प्रतिनिधींनी प्रभागनिहाय ईव्हीएमवर मॉक पोल करून मशिन्सची खात्री केली. प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सीलिंगसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे देऊन प्रक्रिया शांततेत पूर्ण केली.

ही संपूर्ण प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक अधिकारी विवेक कांदे, अतिरिक्त निवडणूक अधिकारी चंद्रशेखर सहारे, नायब तहसीलदार म. रफिक म. बशीरोद्दीन, नायब तहसीलदार बालाजी फोले, मास्टर ट्रेनर स्वामी सर, कानिंदे सर यांनी नियोजनबद्ध रीत्या पार पाडली.

मतदान २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत असेल.
प्रत्येक पात्र मतदाराने निर्भयपणे मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन निवडणूक प्राधिकरणाने केले आहे. मतदान केंद्रावर अडचण आल्यास नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी, अशीही विनंती करण्यात आली आहे.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp