पुणे, दि. २९ : “राजकीय लोकशाही सबळ ठेवायची असेल, तर सामाजिक लोकशाही आणि बंधुता यांचे रक्षण करणे अत्यावश्यक आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये स्वतंत्र नसून एकमेकांना पूरक आहेत. समाजात दररोज वाढणारी विषमता आपण पाहतो, पण अज्ञान आणि चुकीच्या सहनशीलतेमुळे ती सहन करतो,” असे परखड प्रतिपादन ज्येष्ठ विचार
वंत प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी केले.
संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला विश्वस्त अन्वर राजन, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, अॅड. अभय छाजेड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी देशमुख म्हणाले, “संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते आणि संविधानाचे मूळ शिल्पकारही तेच आहेत. सल्लागार बी. एन. राव यांची संयुक्त राष्ट्रसंघात बदली झाल्यानंतर उर्वरित काळात संपूर्ण मसुदा आंबेडकरांनीच तयार केला. त्यामुळे राव यांना संविधानाचे शिल्पकार म्हणणे चुकीचे आहे.”
पवार म्हणाले, “पंडित नेहरूंकडे प्रचंड बहुमत असतानाही त्यांनी हुकूमशाहीकडे पाऊल टाकले नाही. लोकशाहीची मूळ तत्त्वे त्यांनी रुजवली. आज सरकारविरोधात बोलणे नको अशी मानसिकता वाढत आहे, ही चिंताजनक बाब आहे.”
अॅड. छाजेड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता कुरुंदवाडकर यांनी केले.
