किनवट : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाच्या वतीने येथे जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री आणि खासदार खा. अशोकराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सभा दि. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कलावती गार्डन, किनवट येथे पार पडणार आहे.
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने, सर्वच राजकीय पक्षांनी बैठका, जनसंवाद आणि इच्छुक उमेदवारांसोबत चर्चांना वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपसाठी ही सभा विशेष महत्त्वाची ठरणार आहे.
भाजपला किनवट तालुक्यात निर्णायक यश मिळवून देण्यासाठी आमदार भीमराव केराम हे सक्रियपणे संघटनात्मक रणनीती आखत आहेत. त्यांच्या पुढाकारानेच ही जनसंवाद सभा आयोजित करण्यात आली असून, सभेत खा. अशोकराव चव्हाण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
नुकतेच भाजपच्या मराठवाडा संघटन मंत्र्यांनीही किनवट दौरा करून निवडणूक तयारीचा आढावा घेतला होता. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या सभेदरम्यान नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपची आगामी दिशा आणि रणनीती ठरविण्यावर चर्चा होणार आहे.
आमदार भीमराव केराम यांनी सर्व कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना दि. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कलावती गार्डन येथे होणाऱ्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment
0 Comments