किनवट : पिंपरफोडी–सिंगारवाडी–इंजेगाव जोडरस्त्याचे चार महिन्यांपूर्वी झालेले डांबरीकरण पूर्णपणे उखडून गेल्याने रस्ता खड्डेमय झाला असून, वाहतुकीची अक्षरशः वाट लागली आहे. दररोज या मार्गावरून शिक्षण, व्यवसाय, आरोग्यसेवा तसेच मालवाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर वाहने धावत असतात. मात्र, दळणवळण विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
हा मार्ग इंजेगावमार्गे थेट तेलंगणा राज्यापर्यंत जोडला गेल्याने कोळसा, सिमेंट, धान्य, बांधकाम साहित्य वाहतूक करणाऱ्या मोठ्या गाड्यांची सतत ये-जा असते. तथापि, रस्त्याच्या कामाला निकृष्ट दर्जा देण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, चार महिन्यांतच डांबराचे थर उखडून खड्डे आणि खाचांचे साम्राज्य तयार झाले आहे.
गेल्या ३० वर्षांपासून या मार्गावर अर्धवट कामे आणि कंत्राटी पद्धतीचे निकृष्ट डांबरीकरण होत आल्याचा इतिहास असून दलदलीच्या मातीमुळे येथे डांबर टिकत नसल्याचा अनुभव वारंवार आला आहे. या परिस्थितीत डांबरीकरणाऐवजी सीसीकरण हा एकमेव पर्याय असताना वारंवार डांबरच टाकले जाते आणि बिले उचलली जातात, अशी जनतेची नाराजी आहे. पुलांवरील व कलवटांवरील कामे देखील अनेक ठिकाणी अपूर्ण आहेत.
पावसाळ्यात या मार्गावरून प्रवास करणे कठीण झाले होते. दर्जेदार काम झाले असते तर रस्ता एवढ्या कमी कालावधीत उद्ध्वस्त झाला नसता, अशी नागरिकांची भावना आहे. कंत्राटदारांच्या राखीव निधीतून तातडीने सीसीकरण करून रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका अवघ्या महिनाभरावर आल्या असताना नागरिकांचा नाराजीचा सूर अधिकच तीव्र होत चालला आहे. आंदोलन किंवा मतदान बहिष्काराची वेळ येण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
