Type Here to Get Search Results !

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानाच्या निषेधार्थ संविधान संरक्षण समितीचा ‘संविधान क्रांती महामोर्चा’

नांदेड : भारतीय संविधानाचे शिल्पकार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात अमर्याद भाष्य करणाऱ्या ग्वाल्हेर येथील वकील अनिल मिश्रा याच्या विरोधात संविधान संरक्षण समिती, नांदेड तर्फे ‘संविधान क्रांती महामोर्चा’ काढण्यात येणार आहे. हा मोर्चा सोमवार, दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुतळ्यापासून (आयटीआय व नियोजित बुद्ध मूर्ती स्थळाजवळून) निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे.

संविधान संरक्षण समितीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनिल मिश्रा नावाच्या मनुवादी वकिलाने संविधानातील आरक्षण, अॅट्रॉसिटी अॅक्ट आणि सामाजिक समतेच्या तरतुदींविरोधात खोट्या माहितीच्या आधारे द्वेषपूर्ण प्रचार मोहीम उघडली आहे. ही बाबासाहेबांचा घोर अपमान करणारी आणि समाजात घृणा व विषमता पसरवणारी आहे.

या संदर्भात समितीने मिश्रा व त्याच्या साथीदारांवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे. “अशा मनुवादी, संविधानविरोधी प्रवृत्तींच्या विरोधात शांत बसणे म्हणजे समतेच्या मूल्यांशी विश्वासघात होईल,” असे समितीचे मत आहे.

मोर्चामध्ये खालील प्रमुख मागण्या मांडण्यात येणार आहेत: गुन्हेगार अनिल मिश्रा आणि त्याच्या जातीयवादी साथीदारांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी,देशातील निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे घ्याव्यात,शासनकर्त्यांकडून होत असलेली सेक्युलॅरिझमची पायमल्ली थांबवावी, सरकारी शिक्षण संस्था बंद करणे थांबवून त्यांना दर्जेदार बनवावे,पाणी, जंगल, जमीन यांसारख्या नैसर्गिक संपत्तीवरील भांडवलदारांचा कब्जा थांबवावा,सरकारी आस्थापनांचे खाजगीकरण रोखावे,समाजकल्याण विभागाचा निधी इतरत्र न वळवता तो समाजकल्याणाच्या कामांसाठीच वापरावा.

या महामोर्चात नांदेड जिल्ह्यातील सर्व समतावादी, आंबेडकरवादी, ओबीसी, दलित, आदिवासी व अल्पसंख्यांक नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क क्रमांक: 9860525588, 9890298865, 9420912209, 9922831586, 9922031095




Post a Comment

0 Comments