Type Here to Get Search Results !

“किनवट नगरपरिषद निवडणूक : २५ हजार मतदार ठरवणार सत्ता! राजकीय रंगत शिगेला”

 



किनवट : किनवट नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत  वाढू लागली असून पुन्हा एकदा मतदारराजा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. २ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत शहरातील १० प्रभागांतील २५ हजार ५९३ मतदारांच्या हाती नगराध्यक्ष आणि २१ नगरसेवकांचे भवितव्य असणार आहे. यामध्ये १२,३३४ पुरुष, १३,२५६ महिला आणि ३ इतर मतदारांचा समावेश असून महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा ९२२ ने अधिक आहे.


आचारसंहितेचे सावट : उमेदवारी दाखल यंत्रणा सुरूच

नगराध्यक्षांची थेट जनतेतून निवड होत असल्यानं ४ नोव्हेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १० नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून १८ नोव्हेंबरला छाननी, २१ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आणि २६ नोव्हेंबरला चिन्हांचे वाटप होणार आहे. मतदान २ डिसेंबरला होईल.


नवीन प्रभागरचना : दहाव्या प्रभागाला तीन सदस्य

२०१७ च्या तुलनेत प्रभागरचनेत बदल झाले असून यंदा १० प्रभागांमधून २१ नगरसेवक निवडले जाणार आहेत.
पहिल्या नऊ प्रभागांत प्रत्येकी दोन, तर दहाव्या प्रभागात तीन सदस्य निवडले जातील. मतदारसंख्येनुसार प्रभाग ५ सर्वांत लहान (१,८७८ मतदार) तर प्रभाग १० सर्वांत मोठा (४,३३६ मतदार) आहे.


पक्षांची यादी अद्याप गायब : इच्छुकांची धाकधूक कायम

प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा अद्याप न झाल्याने इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.आज(ता.१५) पर्यंत पाच नगराध्यक्ष आणि ६१ नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल झाल्याची माहिती मिळाली. प्रत्यक्ष तिकिटासाठी अनेकांना शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे चित्र आहे.


दुबार नावांचा मुद्दा : ‘डबल स्टार’ मतदारांना फक्त एका प्रभागातच मतदान

शहरातील १६२ मतदारांची नावे दोन किंवा तीन प्रभागांत असल्याचे प्रशासनाला आढळले आहे. या मतदारांच्या नावासमोर यंत्रणेत ‘डबल स्टार’ दाखवण्यात आले आहे. संबंधित मतदारांना फक्त एकाच प्रभागात मतदान करणे बंधनकारक राहणार असून, पडताळणीची प्रक्रिया तहसीलदार व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


किनवटमध्ये निवडणुकीची रंगत: चर्चांना उधाण

निवडणुकीची तारीख जवळ येताच शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवारी मिळवणार? कोण रिंगणात उतरणार? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
साडेपंचवीस हजार मतदारांचे ‘मतांचे दान’ कोणाच्या झोळीत पडते, याचा फैसला ३ डिसेंबरला होणार आहे.



Post a Comment

0 Comments