नांदेडमध्ये 'फुले-शाहू-आंबेडकर-अण्णा भाऊ साठे' व्याख्यानमालेचे आयोजन विचारक्रांतीच्या दिशेने नवा प्रवास १० व ११ जानेवारीला

नांदेड : येथील कल्चरल असोसिएशनतर्फे फुले-शाहू-आंबेडकर-अण्णा भाऊ साठे व्याख्यानमालेचे भव्य आयोजन १० व ११ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. सामाजिक परिवर्तन, समतेचा विचार आणि साहित्यिक परंपरेचा जागर यासाठी ही व्याख्यानमाला प्रेरणादायी ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ १० जानेवारी रोजी होणार असून त्याचे उद्घाटन पुण्याचे ख्यातनाम उद्योजक सी. आर. सांगलीकर यांच्या हस्ते केले जाईल. उद्घाटनाचे पुष्प गुंफण्याचा मान 'यूजीसी' चे माजी अध्यक्ष व पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांना मिळणार आहे. तसेच पी.ई.एस. सोसायटीचे नव्याने निवडून आलेले सदस्य प्राचार्य डॉ. विठ्ठल खाडे प्रमुख उपस्थिती म्हणून हजर राहणार आहेत.

११ जानेवारी, रविवार रोजी पुण्याच्या प्रख्यात लेखिका किरण मोघे यांच्या विशेष व्याख्यानाने व्याख्यानमालेचा समारोप होईल. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या लत्ता भिसे या प्रमुख अतिथी असतील.

याच प्रसंगी प्राचार्य अशोक नवसागरे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे.

या व्याख्यानमालेचा सामाजिक-सांस्कृतिक संवेदनशीलता आणि प्रबोधनाचा प्रसार करण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले असून या कार्यक्रमाचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गोणारकरउपाध्यक्ष रामदास होटकर आणि सचिव डॉ. विजयकुमार माहुरे यांनी केले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post
आमच्याशी संपर्क करा