किनवट : तालुक्यातील शिवणी परिसरात अवैध गांजाच्या शेतीविरुद्ध पोलिसांनी रविवारी कारवाई करत तब्बल 16 किलो 50 ग्रॅम गांजा हस्तगत केला असून, एक संशयित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे इस्लापूर पोलीस पथकाने शिवणी–झळकवाडी रोडलगत असलेल्या तूर पिकाच्या शेतात छापा टाकला. सुमारे 11 वाजता झालेल्या या अंमलीमाल छाप्यात ओली तसेच सुक्या स्वरूपातील गांजाची झाडे जप्त करण्यात आली. सदर अंमलीमालाची किंमत सुमारे 1 लाख 60 हजार रुपये असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
नांदेडचे पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हिमायतनगर ठाण्याचे निरीक्षक अमोल भगत यांच्या पर्यवेक्षणाखाली ही मोहिम राबविण्यात आली. इस्लापूर पोलीस ठाण्याचे सपोनि उमेश भोसले यांनी कारवाईचे नेतृत्व केले. घटनास्थळी मोबाईल फॉरेन्सिक टीमने पंचनामा, नमुने संकलन व सील प्रक्रिया पूर्ण केली.
या वेळी पोलिस उपनिरीक्षक कोमल कागणे, ओ.ओ. डीडेवार, एस.ए. साखरे, तसेच महसूल विभागातील अधिकारी व होमगार्ड कर्मचारी यांची उपस्थिती होती. पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहता काही काळ परिसरात हालचाल वाढल्याचे निदर्शनास आले.
चौकशीतून गांजा पुरवठा साखळी आणि तस्करी संबंधी काही महत्त्वपूर्ण धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, सपोनि भोसले यांच्या नेतृत्वाखाली पुढील कायदेशीर कारवाई सुरु असल्याची माहिती मिळाली.
