सीटूच्या राज्य सचिवपदी कॉ. उज्ज्वला पडलवार : नांदेडच्या चार जणांची राज्यकार्यकारणीवर फेरनिवड


नांदेड :
कामगार, कष्टकरी, कंत्राटी कर्मचारी, आशा कामगार, गटप्रवर्तक तसेच शोषित-पिडीत घटकांच्या न्यायहक्कासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने रस्त्यावर लढा देणाऱ्या कॉ. उज्ज्वला पडलवार यांची सीटूच्या राज्य सचिवपदी निवड करण्यात आली आहे. त्याचवेळी नांदेड जिल्ह्यातील चार पदाधिकाऱ्यांची राज्य कार्यकारिणीत फेरनिवड झाली आहे.

चेंबूर येथील आदर्श विद्यालयात ५ ते ७ डिसेंबरदरम्यान पार पडलेल्या सीटूच्या राज्य अधिवेशनात ही निवड जाहीर करण्यात आली. या अधिवेशनात राज्य सचिव म्हणून तरुण नेतृत्व कॉ. पडलवार यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. तसेच राज्य कमिटीवर सरचिटणीस कॉ. गंगाधर गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष कॉ. अनिल कराळे आणि कॉ. करवंदा गायकवाड यांची फेरनिवड करण्यात आली.

राज्य अधिवेशनात कॉ. डॉ. डी. एल. कराड यांची अध्यक्ष, कॉ. अॅड. एम. एच. शेख यांची महासचिव आणि कॉ. के. आर. रघु यांची कोषाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.

या अधिवेशनात महाराष्ट्रातील २२ जिल्हे आणि सात राज्यस्तरीय संघटनांमधून ३५७ प्रतिनिधी सहभागी झाले. यापैकी १३५ महिला प्रतिनिधींचा सहभाग लक्षणीय ठरला.

अधिवेशनात सीटूचे राष्ट्रीय महासचिव माजी खासदार कॉ. तपन सेन, राष्ट्रीय अध्यक्षा कॉ. के. हेमलता, राष्ट्रीय सचिव कॉ. आर. करूमालयन, माजी आमदार कॉ. नरसय्या आडम आणि आमदार कॉ. विनोद निकोले यांनी मार्गदर्शन केले. नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यासाठी यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp