किनवट : महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा येथे “भारतीय संविधानातून मानवी हक्कांचा जाहिरनामा” या विषयावर प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ, अंबाडीचे सचिव अभियंता प्रशांत ठमके होते. विचारमंचावर ॲड. विक्रांत गवई, डॉ. मोनाली गवई, प्राचार्या शुभांगीताई ठमके, गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने, केंद्रप्रमुख उत्तम कानिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमेचे पुष्पांजली वाहून अभिवादन केले. सुरुवातीला कु. शुभांगी भद्रे हिने संविधान विषयावर प्रभावी भाषण केले. त्यानंतर प्रा.वैशाली साबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
मुख्य वक्त्यांच्या मांडणीत संविधानातील मूलभूत हक्क, विशेषत: कलम १४ मधील “कायद्यासमोर सर्व समान” या तत्त्वाचा अर्थ आणि समाजातील त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यावर विशेष प्रकाश टाकण्यात आला. स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तत्त्वं व्यवहारात अंगीकारली गेली तरच संविधानाचा खरा हेतू पूर्ण होईल, असे डॉ. गवई यांनी सांगितले.
सूत्रसंचालन प्रा. संतोषसिंह बैसठाकुर यांनी केले. उपप्राचार्य राधेश्याम जाधव यांनी आभार मानले. संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी प्राचार्य प्रमोद मुनेश्वर, उपमुख्याध्यापक किशोर डांगे, पर्यवेक्षक प्रा. रघुनाथ इंगळे, मनोज भोयर, मुकुंद मुनेश्वर तसेच शिक्षक–शिक्षिका, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



