किनवट : तब्बल आठ वर्षांनंतर झालेल्या नगरपरिषद निवडणुकीमुळे किनवट शहराचा राजकीय पट पुन्हा एकदा तापला आहे. या वेळी नव्या- जुन्या उमेदवारांची जोरदार टक्कर पाहायला मिळाल्याने निवडणुकीची रंगत पूर्वीपेक्षा अधिक वाढली. प्रचाराला सुरुवात झाल्यापासूनच शहरातील वातावरण ढोलताशांच्या गजरात, घरोघरीच्या भेटींमध्ये आणि चर्चेच्या राजकारणात पूर्णपणे बुडालेले दिसले.
प्रचारादरम्यान मातब्बर नेत्यांनी मतदार यादींची सूक्ष्म छाननी करत दारोदारी संपर्क मोहीम राबवली. काही उमेदवारांनी तर ‘लक्ष्मी दर्शन’ची लाट उसळवत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याचेही सातत्याने पाहायला मिळाले. या साऱ्या घडामोडींमुळे मतदारांच्या मनात मात्र मोठा गोंधळ निर्माण झाला — “नेमके मत द्यायचे कोणाला?”
मतदारराजा पूर्वीपेक्षा अधिक जागरूक व सतर्क झाल्याचे यंदा प्रकर्षाने जाणवले. एका उमेदवाराच्या स्पष्ट बाजूने उभे राहण्याऐवजी अनेकजण सर्व गट-उमेदवारांशी सौहार्दाचे संबंध ठेवताना दिसले. कोण कोणाच्या पाठीशी आहे हे शेवटच्या क्षणापर्यंत स्पष्ट न झाल्याने राजकीय समीकरणांची खिचडी चांगलीच शिजली.
निवडणूक तज्ज्ञांच्या मते या वेळी क्रॉस व्होटिंगची शक्यता प्रचंड वाढली असून त्याचा नेमका फटका कोणाला बसणार, तर कोणाला अनपेक्षित लाभ होणार, हे मतमोजणीशिवाय सांगता येणे कठीण आहे.
जरी मतदान पार पडले असले तरी शहरातील चर्चा अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. सकाळच्या चहाच्या टपऱ्यांपासून संध्याकाळच्या चौकापर्यंत, हॉटेल-धाब्यांपासून बाजारपेठेपर्यंत— सध्या एकच प्रश्न कानावर येतो :
“किनवटचा निकाल कोणाच्या बाजूने झुकणार?”
निवडणुकीचा तापमानवाढीचा आलेख अजूनही उच्चांकावर आहे.
आता सर्वांचे डोळे ता.२१ च्या मतमोजणीच्या दिवसावर खिळले आहे.
कोणाचे राजकीय भविष्य उजळणार?
कोणाला मिळणार अनपेक्षित धक्का?
याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.