
भगवान मारपवार
किनवट : महाराष्ट्रात दिव्यांग हक्कांसाठी लढा देणाऱ्या प्रहार अपंग क्रांती आंदोलनतर्फे राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर शुक्रवारी (दि. १२) दुपारी १२ वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन,प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष भगवान मारपवार यांनी केले आहे.
या आंदोलनाद्वारे शासनाने दिव्यांगांसंबंधित विविध धोरणे केवळ कागदोपत्री न ठेवता प्रभावीपणे राबवावीत, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
मुख्य मागण्या
• आमदार-खासदार निधीतून शासन निर्णयानुसार ५% दिव्यांग निधी नियमित खर्च करणे बंधनकारक करावे.
• पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि आमदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व तालुका स्तरावरील समित्या तात्काळ स्थापन कराव्यात.
• सर्व दिव्यांगांना एकसमान रु. २५००/- मासिक पेन्शन देण्यात यावी.
• जिल्हा नियोजन समितीच्या निधीतील १% रक्कम दिव्यांग विकासासाठी खर्च करण्याचा निर्णय अमलात आणावा.
• भूमिहीन व बेघर दिव्यांगांना राहण्यासाठी १ गुंठा सरकारी जागा देण्यात यावी.
नांदेड जिल्ह्यात आंदोलनाचं केंद्र
या आंदोलनासाठी नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिव्यांग समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून शासनाने मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्यातील दिव्यांगांच्या प्रश्नाकडे शासनाने ठोस भूमिका घेईपर्यंत हा लढा सुरू राहणार असल्याचा इशारा आयोजकांनी दिला आहे.