किनवट : न्यायालयीन कामकाज अधिक वेगवान, सुलभ व तंत्रस्नेही करण्याच्या उद्देशाने
दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर), किनवट येथे आयोजित करण्यात आलेली विधीज्ञ व त्यांच्या लिपिकांसाठीची संगणक प्रशिक्षण कार्यशाळा रविवारी (दि. १४) यशस्वीरीत्या संपन्न झाली.यावेळी न्यायाधीश पी.एम.माने , के.जी.मेंढे व वकील संघाचे अध्यक्ष ॲड.किशोर मुनेश्वर यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रशिक्षक म्हणून ॲड.दिलिप काळे व ॲड.पंकज गावंडे हे उपस्थित होते.प्रास्ताविक व सूत्रसंचालन ॲड.विलास सूर्यवंशी यांनी केले महाराष्ट्र न्यायिक अकादमी, उत्तन (ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा. जिल्हा न्यायाधीश-१ तथा जिल्हा प्रकल्प समन्वयक, नांदेड यांच्या सूचनेनुसार ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत न्यायालयातील सर्व वरिष्ठ व कनिष्ठ वकिल सदस्यांनी तसेच त्यांच्या लिपिकांनी सहभाग नोंदवला.
कार्यशाळेत ई-कोर्ट प्रणाली, ऑनलाईन अर्ज व नोंदणी, केस मॅनेजमेंट सिस्टीम, न्यायालयीन डिजिटल प्रक्रिया याविषयी तज्ञ प्रशिक्षकांनी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून संगणक वापराचे प्रशिक्षण देण्यात आल्याने सहभागी विधीज्ञ व लिपिकांना दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करता येणार आहे.
या उपक्रमामुळे न्यायालयीन कामकाजात पारदर्शकता व गती येण्यास मदत होईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) किनवट, पी. एम. माने आणि के.जी.मेंढे यांच्या मार्गदर्शनाचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित सर्वांसाठी प्रशिक्षण साहित्य, चहा-पाणी व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.