किनवट : किनवट नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक दि. २ डिसेंबर रोजी अत्यंत शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. पोलीस प्रशासन, निवडणूक निर्णय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. यावेळी नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून होत असल्याने निवडणूक प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली होती.
खरेतर दि. ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, न्यायालयीन आदेशामुळे मतमोजणी व निकालाची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असून आता दि. २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्ते व मतदार वर्गातही उत्सुकतेचे वातावरण कायम आहे. निकाल लांबल्याने शहरात संयम आणि शांततेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
या निवडणुकीत मतदारांसमोर अनेक पर्याय होते. तीन ते चार ईव्हीएम मशीनवर मतदान करावे लागल्यामुळे काही नागरिकांमध्ये सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, तरीही मोठ्या संख्येने मतदारांनी आपला हक्क बजावत निवडणूक प्रक्रिया यशस्वी केली. आता कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात मतदारांनी कौल दिला, हे दि. २१ डिसेंबरला स्पष्ट होणार आहे.
नगराध्यक्षपद हे खुला प्रवर्ग (महिला) असल्यामुळे महिला उमेदवारांमध्येही चुरशीची लढत पाहायला मिळाली. यासोबतच नगरपरिषद सभागृहात कोणते उमेदवार नगरसेवक म्हणून स्थान मिळवणार आणि कोणाला पराभव स्वीकारावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. किनवट शहरातील रेल्वे स्थानक, बस स्थानक, प्रमुख चौक व गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी अनेक वर्षांपासून नागरिकांकडून होत आहे. खरबी पॉइंट, जिजामाता चौक, जयस्तंभ चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आदी ठिकाणी कॅमेरे बसवल्यास गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले जात आहे.
नव्या नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहराच्या विकास आराखड्यात सर्वप्रथम सीसीटीव्ही प्रकल्पाला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. २१ डिसेंबरच्या निकालानंतर शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पावले उचलली जातील, अशी आशा नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
