किनवट : नावीण्यपूर्ण योजनेअंतर्गत तालुका क्रीडा संकुल, किनवट येथील जिम हेल्थ सेंटरसाठी खरेदी करण्यात आलेल्या व्यायाम साहित्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. अत्याधुनिक असल्याचे सांगून पुरविण्यात आलेले जिम साहित्य प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करण्यात येत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बबन वानखेडे यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी दि. ११ डिसेंबर २०२८ रोजी उपजिल्हाधिकारी तथा आदिवासी प्रकल्प अधिकारी, किनवट यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे. नावीण्यपूर्ण योजनेअंतर्गत जिम हेल्थ सेंटरसाठी अत्याधुनिक व्यायाम साहित्य खरेदीस मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार सुमारे दोन महिन्यांपूर्वी सदर साहित्याचा पुरवठा करण्यात आला. मात्र, वापरात आलेले साहित्य अपेक्षित दर्जाचे नसून त्याची गुणवत्ता अत्यंत खालावलेली असल्याचे निदर्शनास येत आहे.
तसेच या साहित्याचे दर प्रत्यक्ष बाजारभावापेक्षा अधिक दाखविण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, खरेदी प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार किंवा अपहार झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ व सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, तसेच खरेदी प्रक्रियेतील सर्व बाबींचा तपशीलवार आढावा घेण्यात यावा, अशी ठाम मागणी बबन वानखेडे यांनी केली आहे.
