किनवट, दि. ६ : सामाजिक परिवर्तनाचे अनन्य कार्यकर्ते आणि भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त किनवट शहरातील ‘युवा पॅंथर’तर्फे आज (ता.६) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. समता, बंधुता व मानवता या डॉ. आंबेडकरांच्या मूल्यांना रक्तदानाचा प्रत्यक्ष अविष्कार देण्याचा उद्देश यामागे होता.
यावर्षी शिबिराला विशेष स्वरूप देत २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस व सैनिकांना रक्तदानातून श्रद्धांजली अर्पण करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. त्यामुळे ‘कृतिशील अभिवादन’ या संकल्पनेला विशेष अधोरेखित अर्थ प्राप्त झाला.
या उपक्रमाचे प्रमुख आयोजक ॲड. सम्राट सर्पे व निखिल वि. कावळे असून गेल्या आठ वर्षांपासून ‘युवा पॅंथर’तर्फे रक्तदानाच्या माध्यमातून समाजजागृतीचा हा उपक्रम सातत्याने होत आहे. या शिबिरात ७० रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून कर्तव्यभाव व्यक्त केला.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते झाले. यावेळी दादाराव कयापक, प्रशांत ठमके, विनोद भरणे, मिलिंद सर्पे, संदीप केंद्रे, आनंद मच्छेवार, मारोती मुनेश्वर, विवेक ओंकार आदी मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान शिबिरात तरुणांसोबत महिला, विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. समाजातून या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक व्यक्त होत असून आंबेडकरी विचारांच्या माध्यमातून राष्ट्रीय कर्तव्यभावना जागृत करणारा हा अभिनव उपक्रम ठरल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.



