“भारतीय संविधान राष्ट्रीय एकात्मतेचा अभेद्य धागा” – रामदास आठवले



मुंबई : 
भारतीय संविधानाची निर्मिती करून देशातील विविधतेला एका अखंड धाग्यात गुंफण्याचे ऐतिहासिक कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यामुळे भारताला खंडित करण्याचा प्रयत्न करणारे विचार स्वतःच कोलमडून पडतील, अशी टिप्पणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली.

महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी व त्यांच्या पत्नी सौ. सीमाताई आठवले तसेच पुत्र जीत आठवले यांनी विनम्र अभिवादन केले. या वेळी रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे, माजी मंत्री अविनाश महातेकर, काकासाहेब खंबाळकर, हेमंत रणपिसे आदी मान्यवर उपस्थित होते.



आठवले म्हणाले, मानवी मुक्तीचा महामार्ग उभारणारे आणि जगभरातील मानवाधिकार चळवळींना दिशा देणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. एक व्यक्ती – एक मत – एक मूल्य या तत्त्वाने राजकीय समता निर्माण केली आणि सामाजिक-आर्थिक समतेकडे देशाला नेण्याचे ध्येय दिले.

डॉ. आंबेडकरांचा विचार हा संपूर्ण भारताचे राष्ट्रनिर्माण करणारा विचार आहे. त्यांनी केवळ वंचितांचा उद्धार न करता सर्व समाजघटकांच्या कल्याणाचा व्यापक मार्ग मांडला. राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक न्याय, समता व बंधुता या मूल्यांचा ठोस पाया रचून भारताला आधुनिक दिशादर्शन त्यांनी केले, अशा शब्दांत आठवले यांनी क्रांतिवीर डॉ. बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp