किनवट : रेल्वे प्रशासनाने जवळपास वर्षभरापूर्वी सुरू केलेले शिवाजीनगर भुयारी पुलाचे काम अद्याप अपूर्णच असून नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. पुलाची रुंदी व उंची अपुरी असल्याने भविष्यात या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यापूर्वीच पुलाखाली पाणी साचत असल्याचे चित्र दिसून येत असून, सुभाषनगर भुयारी पुलासारखीच अवस्था होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
रेल्वे प्रशासनाने जानेवारी २०२५ मध्ये शिवाजीनगर–एसव्हीएम रस्त्यावरील रेल्वे गेटखाली भुयारी पूल उभारण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, पुलाची उंची व इतर तांत्रिक त्रुटींमुळे या कामाबाबत आक्षेप घेण्यात आले होते. या संदर्भात थेट नवी दिल्ली येथील अनुसूचित जमाती आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने या विलंबासाठी पालिकेवर जबाबदारी टाकत जून महिन्यापासून पुन्हा काम सुरू केले.
जूनमध्ये रेल्वे प्रशासनाने सप्टेंबर २०२५ अखेरपर्यंत भुयारी पुलाचे काम पूर्ण करण्याची हमी दिली होती. मात्र, १५ ऑगस्टनंतर किनवट तालुक्यात झालेल्या सलग अतिवृष्टीमुळे कामावर परिणाम झाल्याचे कारण पुढे करण्यात आले. अतिवृष्टीचे कारण देत अनुसूचित जमाती आयोगाकडून महिनाभराची मुदतवाढही घेण्यात आली. तरीही अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही.
सध्या उभारण्यात आलेल्या पुलाची रुंदी व उंची कमी असल्याने या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक शक्य होणार नाही, अशी स्थिती आहे. तसेच भुयारी रस्ता सरळ न ठेवता तिरकस पद्धतीने तयार करण्यात आल्याने अपघातांची शक्यता वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. पुलाखालील रस्त्यावर सध्या क्युरिंग सुरू असून, टाकलेले पाणी पुलाखालीच साचून राहत आहे. योग्य निचऱ्याची व्यवस्था न झाल्यास या मार्गावरही कायमस्वरूपी पाणी साचण्याचा धोका निर्माण होणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
