राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा; मुंबईसह राजकीय वातावरण तापले


मुंबई :
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाला पुन्हा एकदा वेग आला असून 
मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांची अधिकृत घोषणा आज(दि.१५) करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे.

जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक अधिसूचनेनुसार दि. २३ डिसेंबर २०२५ पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०२५ असून, ३१ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर दि. २ जानेवारी २०२६ रोजी उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची अंतिम संधी देण्यात येणार आहे.

महापालिकांसाठीचे मतदान दि. १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार असून, दि. १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. याच दिवशी निकाल जाहीर होऊन महापालिकांच्या सत्तेचे चित्र स्पष्ट होणार आहे.

मुंबईसह पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) आदी प्रमुख महापालिकांचा या निवडणुकांत समावेश असल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. स्थानिक प्रश्न, विकासकामे, नागरी सुविधा आणि पक्षीय समीकरणे या निवडणुकांत निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच इच्छुक उमेदवार, पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली असून, येत्या काही दिवसांत प्रचाराला जोर येण्याची शक्यता आहे.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp