मुंबई : दक्षिण आफ्रिकेतून तब्बल एक लाख टन सोयाबीनची आयात होत असल्याची चर्चा सुरू असताना शेतकरी वर्गात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, प्रत्यक्षात देशात सोयाबीनचा तुटवडा असल्याचेच या आयातीवरून स्पष्ट होत असून, शेतकऱ्यांनी सध्या घाबरून पॅनिक सेलिंग करण्याची अजिबात गरज नसल्याचे मत महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सचिव डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केले.
डॉ. नवले म्हणाले, “केंद्र सरकारकडून अचानक आयात होण्याचे कारण म्हणजे देशांतर्गत उत्पादन कमी पडणे हेच आहे. त्यामुळे बाजारात दबाव निर्माण झाला असला तरी प्रत्यक्षात दर खाली जाण्याची भीती अनाठायी आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, शेतमालाच्या भावात स्थिरता यावी आणि शेतकऱ्यांना किमान ५,३२८ रुपये प्रतिक्विंटल दर मिळावा, यासाठी केंद्राने तातडीने हस्तक्षेप करावा. सध्या सरकारने तात्पुरती आयात थांबवण्याचा निर्णय घेणे अत्यावश्यक असून, शेतकऱ्यांना योग्य हमीभावाची हमी देणेही गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
किसान सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, बाजारातील क्षणिक परिस्थिती पाहून त्वरित माल विकण्यापेक्षा काही दिवस प्रतीक्षा करावी. जागतिक बाजारभाव, देशांतर्गत मागणी आणि तेलबियांच्या उत्पादनातील असंतुलन पाहता सोयाबीनच्या दरात पुन्हा सुधारणा होण्याची शक्यता आहे, असेही नवले यांनी सांगितले.
एकूणच सोयाबीनचे उत्पादन घट, तेलउद्योगातील वाढती मागणी आणि आयातीची वेळ पाहता, सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शाश्वत धोरण लागू करणे काळाची गरज असल्याचे किसान सभेचे मत आहे.
