छत्रपती संभाजीनगर : ‘संविधान मूल्यांचे संवर्धन व प्रतिष्ठा’ या प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित प्रगतिशील साहित्य संमेलन येत्या शनिवार, २७ डिसेंबर २०२५ रोजी समर्थनगर येथील विवेकानंद महाविद्यालयात उत्साहात पार पडणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ ग्रामीण कथाकार व कादंबरीकार उत्तम बावस्कर यांची निवड करण्यात आली असून स्वागताध्यक्ष म्हणून विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव श्रीमंतराव शिसोदे कार्यरत राहतील. माजी संमेलनाध्यक्ष ॲड. मिर्झा अस्लम यांची यावेळी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
प्रगतिशील लेखक संघ आणि विवेकानंद महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनात विविध साहित्यिक - चिंतनात्मक कार्यक्रमांची मेजवानी साहित्यप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे. साहित्य, समाज आणि संविधान मूल्यांवर प्रकाश टाकणारे चर्चासत्र, व्याख्यानमाला आणि संवाद सत्रांनी संमेलनाचे व्यासपीठ समृद्ध होणार आहे.
या संमेलनात साहित्य रसिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रगतिशील लेखक संघाचे अध्यक्ष डॉ. सुधाकर शेंडगे, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादाराव शेंगुळे, मराठी विभाग प्रमुख डॉ. दत्तात्रय डुंबरे, उपाध्यक्ष डॉ. शेख इक्बाल मिन्ने, सचिव डॉ. समाधान इंगळे, सहसचिव आशा डांगे, मराठवाडा संघटक सुनील उबाळे, कोषाध्यक्ष डॉ. सोमनाथ वांजरवाडे, तसेच सदस्य डॉ. सविता लोंढे, चक्रधर डाके, माधुरी चौधरी, डॉ. नवनाथ गोरे यांनी केले आहे.
