किनवट, दि.६ : शालेय पोषण आहार योजना राबविणाऱ्या कामगारांना मागील मंत्रीमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आलेली १००० रुपयांची मानधनवाढ अद्याप अंमलात न आल्याने कामगारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या संदर्भात महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटना फेडरेशन (CITU) तर्फे किनवट विधानसभा आमदार मा. भीमराव केराम यांना आज(ता .६)निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील शाळांमध्ये १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन बनविणाऱ्या कामगारांमध्ये बहुतेक विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत, ओबीसी, दलित, अल्पसंख्याक व गरीब कुटुंबातील महिला कामगार कार्यरत आहेत. त्यांना पाणी आणणे, स्वच्छता, स्वयंपाक, भांडी धुणे, विद्यार्थ्यांना भोजन देणे अशा अनेक कामांची जबाबदारी असून दररोज ६ तास सेवा दिल्याबदल्यात केवळ २५०० रुपये मानधन मिळते तेही वेळेवर दिले जात नाही, अशी तक्रार संघटनेने केली आहे.
२९ ऑक्टोबर रोजी शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भूसे यांनी मानधन वाढीबाबत आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्ष निर्णय झाला नाही, असा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे.
प्रमुख मागण्या
मंत्रीमंडळाने ५ जुलै २०२४ रोजी घेतलेल्या १००० रुपये मानधनवाढीच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करून फरक बिल अदा करावे.
कामकाज व कामाचा कालावधी पाहता किमान वेतन १८,००० रुपये देण्यात यावे
१० ऐवजी १२ महिने मानधन द्यावे
विद्यार्थ्यांची पटसंख्या निकष रद्द करून कापलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे
निवेदन देणाऱ्यांमध्ये जनार्दन काळे, बाबा भाई, शेख चांद, मिलिंद सर्पे आदींचा समावेश होता.
संघटनेने हिवाळी अधिवेशनात मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी नम्र विनंतीही केली आहे.
Tags
||जिल्हा||
