![]() |
| आदरांजली सभेत मनोगत व्यक्त करताना माधव बावगे |
किनवट : कष्टकरी, श्रमिक आणि वंचितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने सामाजिक चळवळीत निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी आहे. त्यांच्या कार्याची उजळणी करत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारत जोडो युवा अकादमी व साने गुरुजी रुग्णालय परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले.
ही आदरांजली सभा दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता साने गुरुजी रुग्णालयाच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी भारत जोडो युवा अकादमीचे पदाधिकारी, साने गुरुजी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी, तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेत वक्त्यांनी डॉ. बाबा आढाव यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करताना, कष्टकरी वर्गाला संघटित करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान, अन्यायाविरोधात उभारलेली आंदोलने आणि सामाजिक समतेसाठी केलेला अखंड संघर्ष यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. श्रमिक, कामगार आणि शोषित घटकांच्या न्यायासाठी त्यांनी आयुष्यभर झगडत लोकशाही मूल्ये जपली, असे मत व्यक्त करण्यात आले.
या श्रद्धांजली सभेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष राज्य अध्यक्ष माधव बावगे,श्री. सूर्यवंशी, डॉ. अशोक बेलखोडे यांनी अभिवादन पर मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डाॅ. पंजाब शेरे यांनी केले, तर अध्यक्षीय समारोप प्रा. रामप्रसाद तौर यांनी केला. शेवटी उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून डॉ. बाबा आढाव यांना श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी प्रा. गजानन सोनोने, , संजय बोल्लेनवार, डॉ. काळे, प्राचार्य सुभाष काळे यांच्या सह अनेकजण उपस्थित होते.सभेचे आयोजन भारत जोडो युवा अकादमी यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते.
![]() |
| बाबा आढाव यांना आदरांजली अर्पण करतांना प्रा.रामप्रसाद तौर |

