किनवट : नगर परिषद निवडणुकीचे मतदान (दि. २) शांततेत पार पडले. तब्बल ७४ टक्के मतदान नोंदवले गेले. नगराध्यक्षपदासाठी भाजप महायुतीच्या पुष्पा मच्छेवार आणि शिवसेना (उबाठा)च्या सुझाता येंड्रलवार यांच्यात थेट दुरंगी लढत रंगली. नगराध्यक्षांसह नगरसेवकांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे.
या निवडणुकीच्या सुरुवातीला महाविकास आघाडी आणि महायुतीचा सरळ सामना होता. मात्र, महायुतीकडून राजकीय रणनीती शेवटच्या क्षणी ठरवल्याने अनेक इच्छुकांना अपक्ष उमेदवारी दाखल करता आली नाही. काहींना नामांकन मागे घ्यावे लागले, तर काही उमेदवारांचे A-B फॉर्म न आल्याने अर्ज आपोआप बाद झाले.
याउलट महाविकास आघाडीतही गोंधळ निर्माण झाला. कारण, ८ वर्षे आघाडीचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे माजी नगराध्यक्ष साजिद खान यांनी अंतिम क्षणी महायुतीचा हात पकडल्याने समीकरणे बदलली. विस्कळीत आघाडीची सूत्रे शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे, काँग्रेस नेत्या बेबीताई, युवा नेते कपिल नाईक व करण येंड्रलवार यांनी हातात घेतली आणि अंतिम क्षणापर्यंत जोरदार लढा दिला.
प्रचारादरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचित बहुजन आघाडीचे सुझात आंबेडकर यांनी किनवटला भेट दिली. शिवसेनेतर्फे आ. हेमंत पाटील प्रचारासाठी हजर होते. महायुतीच्या बाजूने आ. भीमराव केराम व अॅड. प्रतिक केराम यांनी मोर्चा सांभाळला. शेवटच्या दिवशी झालेल्या भाजप सभेत महानगराध्यक्ष प्रविण साले आणि जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख उपस्थित होते. मात्र, भाजपाच्या नाराज कार्यकर्त्यांची सक्रियता शेवटपर्यंत कमी दिसली.
निकालावर जिल्ह्याचे डोळे
या निवडणुकीत आ. भीमराव केराम यांनी ‘कॉस्मोपॉलिटन विचार’ मांडण्याचा नवा प्रयोग केला. ओबीसी प्रवर्गातील महिला उमेदवाराला ओपन-आरक्षित नगराध्यक्ष पदावर संधी देत भाजपचे बहुसांस्कृतिक दृष्टिकोनाशी जुळणारे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना (उबाठा)च्या सुझाता येंड्रलवार या किनवटच्या कन्या असल्याने त्यांची उमेदवारी स्थानिक पातळीवर अधिक प्रभावी ठरली.
निवडणुकीत पारंपरिक हिंदू–मुस्लिम ध्रुवीकरण न दिसता, मुस्लिम मतदार भाजपकडे वळल्याचे, तर हिंदू मत भाजपाबरोबरच इतर पक्षांकडेही विभागल्याचे चित्र दिसले. महाविकास आघाडीतील समन्वयातून काँग्रेसने शिवसेना (उबाठा) उमेदवारास पाठिंबा दिला. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार मुस्लिम समाजात प्रभावी ठरला; तर एमआयएम किती मते घेते यावर अनेकांचे राजकीय गणित अवलंबून आहे.
दरम्यान, काही ठिकाणी कथित "लक्ष्मी दर्शन" आणि दारू वितरणाच्या चर्चा सुरू होत्या. अनेक मतदारांनी राजकीय मजुरीसाठी आपल्या पारंपरिक व्यवसायातून आठवड्याची सुट्टी घेतल्याचेही दिसले.
या निवडणुकीत नऊ प्रभागांमध्ये दोन तर एका प्रभागात तीन नगरसेवक पदांसाठी उमेदवार होते. महाविकास आघाडीची मशाल, तुतारीवाला, पंजा, अलमारी, टीव्ही अशी चिन्हे तर महायुतीकडे कमळ, घडी, धनुष्यबाण अशी ओळखीची चिन्हे होती.
ईव्हीएमवर योग्य उमेदवाराचे बटण ३–४ वेळा दाबण्याची आवश्यकता काही मतदारांना त्रासदायक ठरली. काही केंद्रांवर ‘रिचार्ज’ प्रतिक्षेमुळे दुपारी ४ नंतरही मतदान सुरू होते. चिन्हांच्या गोंधळात कोणत्याही पक्षाला ५ नगरसेवकांचा आकडा गाठणे कठीण दिसत असून २ अपक्ष निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. क्रॉस-वोटिंगचा फटका दोन्ही प्रमुख उमेदवारांना बसू शकतो, अशीही चर्चा आहे.
निकाल २१ डिसेंबर रोजी घोषित होणार असल्याची माहिती मिळताच काही उमेदवार नाराज झाले. संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यात यश मिळवले. निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर यांनी निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.
