नांदेड : मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी भूमिकेतून सातत्याने कामगार, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी लढा देणारे लढवय्ये कार्यकर्ते कॉ. गंगाधर गायकवाड यांना कामगार चळवळीतल्या ‘बहुजन रत्न पुरस्काराने’ नुकतेच सन्मानित करण्यात आले.
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय आंबेडकर महासभा, जि. नांदेड यांच्या वतीने ३० नोव्हेंबर रोजी पीपल्स कॉलेज येथील नरहर कुरुंदकर सभागृहात हा पुरस्कार प्रदान समारंभ भव्यदिव्य पद्धतीने पार पडला. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला.
कॉ. गायकवाड हे सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन्स (सीटू) चे जनरल सेक्रेटरी तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा सचिव मंडळाचे सदस्य आणि नांदेड तालुका कमिटीचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक न्यायासाठी त्यांनी केलेल्या धडाडीच्या कार्याची अनेक उदाहरणे जिल्ह्यात सर्वत्र चर्चिली जातात. द हिंदू या राष्ट्रीय वृत्तपत्राच्या नोंदणीकृत प्रेसमध्ये त्यांनी केलेल्या तपासणी पत्रकारितेतून अनेक गैरप्रकार उघडकीस आणण्यात आले असून, त्यांना चळवळीत ‘पँथर’ म्हणूनही ओळखले जाते.
यापूर्वी त्यांना श्रम सेवा, समर गौरव, समाज घडवीणारे धुरंधर, चळवळीतील पँथर, कॉ. अण्णा भाऊ साठे पुरस्कार, सामाजिक कार्य पुरस्कार, ख्रिश्चन अल्पसंख्यांक सेवा संस्था पुरस्कार, राष्ट्रीय कलाल पुरस्कार, गौड समाज युवा संघर्ष समितीचा राज्यस्तरीय पुरस्कार तसेच जिल्हाधिकारी नांदेड यांच्या हस्ते कोरोना योद्धा असे अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.
या वेळी वैयक्तिक कारणामुळे समारंभास उपस्थित राहता न आल्याने डीवायएफआयचे तालुका उपाध्यक्ष कॉ. सुभाषचंद्र गजभारे यांनी त्यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक राज गोडबोले, उद्घाटक म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव दूधंबे, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अशोक ढोले, ऍड. भीमराव हाटकर, धनंजय बेलोकर, भीमशाहीर ललकार बाबू आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व पत्रकार श्रावण नरवाडे, युवा जिल्हाध्यक्ष दीपक साळवे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कॉ. गायकवाड यांना 'बहुजन रत्न' पुरस्कार जाहीर झाल्याने सीटू जिल्हा कमिटीने आयोजकांचे आभार मानत त्यांच्या आगामी सामाजिक आणि कामगार चळवळीतील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
