किनवट : तालुक्यातील अप्पारावपेठ व शिवणी हे अतिदुर्गम भाग म्हणून ओळखले जातात. आरोग्य सेवेत कार्यरत नर्स व सुपरवायझर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या भागातून तब्बल ४२ महिलांनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी सहभाग नोंदवला. मात्र आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
कडाक्याच्या थंडीत शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांना भोजन, शुद्ध पाणी, बाथरूम या मूलभूत सुविधा अपुऱ्या पडल्या. ८ डिसेंबर रोजी अप्पारावपेठच्या १५ व शिवणीच्या २७ महिलांना तपासणीसाठी आणण्यात आले होते. तर ९ डिसेंबर रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली.
परंतु काही महिलांना कॉटचीही सोय न झाल्याने त्यांना जमिनीवरच झोपण्याची वेळ आली. त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईक आणि लहान मुलांसाठी टेंट किंवा लाईटची कोणतीही व्यवस्था न करण्यात आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लहान लेकरासह आलेल्या महिलांना तर उघड्या आकाशाखाली रात्र काढावी लागली.
राष्ट्रीय कार्यक्रमासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असताना अधिकाऱ्यांच्या खराब नियोजनामुळे रुग्ण व नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतो, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. शिवणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
