छत्रपती संभाजीनगर : संविधान मूल्यांचे संवर्धन व प्रतिष्ठा या ध्येयाने प्रगतिशील लेखक संघाच्यावतीने विविध सांस्कृतिक संस्थांच्या सहकार्याने प्रगतिशील साहित्य संमेलनाचे आयोजन शनिवार, दि. २७ डिसेंबर रोजी विवेकानंद महाविद्यालय, समर्थनगर येथे करण्यात आले आहे. ज्येष्ठ कथाकार व कादंबरीकार मा. उत्तम बावस्कर संमेलनाध्यक्ष म्हणून लाभणार असून प्रसिद्ध कवी व गीतकार मा. प्रशांत मोरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
उद्घाटन सत्रास प्रख्यात कादंबरीकार व प्रलेखचे राज्य महासचिव मा. राकेश वानखेडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून जेष्ठ साहित्यिक अॅड. मिर्झा अस्लम मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आठ वाजून ३० मिनिटांनी ग्रंथदिंडीने होणार आहे.
दुपारी ‘माध्यमे आणि लोकशाही प्रजासत्ताकात विचार स्वातंत्र्याची आवश्यकता’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्ष म्हणून प्रा. जयदेव डोळे कार्यरत राहणार आहेत. या परिसंवादात डॉ. किशोर शिरसाट, दत्ता कानवटे, रोशनी शिंपी आणि अनिकेत म्हस्के सहभागी होणार आहेत.
दुपारी तीन वाजता शाहीर अजिंक्य लिंगायत आणि सहकाऱ्यांचा ‘अजिंक्य शाहिरी’ हा शाहिरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून शाहीर अण्णाभाऊ साठे, अमर शेख आणि आत्माराम पाटील यांच्या शाहिरी वारशाला अभिवादन करण्यात येणार आहे.
पुढील सत्रात दुपारी चार ते पाच या वेळेत संविधान मूल्यांचे संवर्धन व प्रतिष्ठा या विषयावर खुल्या चर्चेचे आयोजन करण्यात आले असून अॅड. अभय टाकसाळ, अनंत भवरे व वैभव वाकचौरे संवाद साधणार आहेत.
समारोप सत्र दुपारी पाच वाजता होईल. यावेळी मा. राकेश वानखेडे, डॉ. सुनीती धारवाडकर व प्राचार्य डॉ. दादाराव शेंगुळे उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी सहा वाजता बहुभाषिक खुले कवी संमेलन आयोजित करण्यात आले असून अध्यक्ष प्रसिद्ध कवयित्री ऊर्मिला चाकूरकर असतील. कार्यक्रमास मुंबईचे कवी प्रशांत मोरे व कवी धम्मपाल जाधव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
खुल्या कवी संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवींनी २५ डिसेंबरपर्यंत नोंदणी करणे आवश्यक असून २०० रुपये सहभाग शुल्क निश्चित करण्यात आले आहे. या शुल्कात भोजन कुपन व सहभाग प्रमाणपत्राचा समावेश आहे.
प्रगतिशील साहित्य, संविधान मूल्यांचा व सामाजिक अभिव्यक्तीचा संगम साधणारे हे संमेलन मोठ्या उत्साहात पार पडण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
