किनवट : अंत्योदय कार्डधारकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. तब्बल दीड वर्षांच्या खंडानंतर अखेर रेशन दुकानांतून साखरेचे वितरण सुरू होत आहे. एका अंत्योदय कार्डाला प्रतिमहा एक किलो साखर देण्यात येणार असून सध्या नोव्हेंबर व डिसेंबर २०२५ या दोन महिन्यांची साखर तालुका पुरवठा विभागाकडे उपलब्ध झाली आहे.
टेंडर प्रक्रियेत विलंब झाल्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून रेशन दुकानांत साखर वितरित होत नव्हती. दरम्यान, सामान्य कुटुंबांत मोठ्या प्रमाणावर साखर सण-उत्सवाच्या दिवसांमध्येच वापरली जाते. बाजारपेठेत साखरेचा दर सुमारे ४४ रुपये प्रति किलो असताना रेशन दुकानांत २० रुपयांत मिळणार असल्याने अंत्योदय लाभार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
तालुक्यातील २०१ रेशन दुकानांना साखरेचा पुरवठा सुरू करण्यात आला असून काही दुकानांत साखर पोहोचली आहे. उर्वरित दुकाने लवकरच साखरेने भरली जाणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत लाभार्थ्यांना साखर मिळण्यास सुरुवात होईल, अशी माहिती तालुका पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
“किनवट तालुक्यातील अंत्योदय कार्डधारकांसाठी दोन महिन्यांची साखर उपलब्ध झाली आहे. रेशन दुकानदारांना पुरवठा सुरू आहे. काही दिवसांत लाभार्थींना साखर मिळेल,”
– निलेश राठोड, तालुका पुरवठा निरीक्षक अधिकारी, किनवट.
