किनवटमध्ये मतदानाची संध्याकाळी उसळी : वाढलेल्या टक्क्यामुळे राजकीय हिशेब ढवळून निघणार?


किनवट : 
नगरपरिषद निवडणुकीत सोमवारी शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात मतदान केले. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दीची सुरुवात झाली. दुपारच्या उष्णतेमुळे काही काळ मतदानाची गती मंदावली असली तरी सायंकाळी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्राकडे धाव घेतल्याने एकूण मतदानाचा टक्का लक्षणीयरीत्या वाढला.

सकाळपासून उत्साह, दुपारी मंदावलेली गती

नगरपरिषदेच्या १० प्रभागांतील २९ मतदान केंद्रांवर सकाळी ८ वाजता मतदानास सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांतच १० ते १२ टक्के मतदान झाले. महिलांचा आणि तरुणांचा सकाळी लवकर मतदानाला विशेष प्रतिसाद होता. मात्र दुपारच्या उन्हाचा तडाखा वाढताच काही केंद्रांवर मतदारांची संख्या घटली.

सायंकाळी पुन्हा वाढलेली गर्दी

मतदानदुपारच्या वेळी प्रतिसाद मंदावला असला तरी ३.३० वाजेपर्यंत ४६.२१ टक्के मतदान झाले. कामकाज आटोपून ५ नंतर नागरिक पुन्हा केंद्रांवर मोठ्या संख्येने दाखल झाले आणि ५.३० वाजता मतदानाचा टक्का तब्बल ७४.२७% इतका झाला.
मतदान आकडेवारी— पुरुष : ९४३८, महिला : ९५६८, इतर : २, एकूण : १९,००८

उमेदवारांची दिवसभर धावपळ

सकाळपासूनच उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदानासाठी सक्रियपणे आवाहन केले. वाहनांची वर्दळ, बुथवरील गजबज, चर्चा—अंदाज यामुळे शहरातील निवडणूक वातावरण अधिक तापले.

वाढलेला मतदान टक्का कोणाला लाभदायी?

गेल्या महिनाभरापासून विविध राजकीय समीकरणे, गटबाजी आणि स्थानिक मुद्द्यांवर मतदारांचा कल बदलत असल्याचे संकेत मिळत होते. वाढलेल्या मतदान टक्याचा फटका कोणाला बसणार आणि कोणाच्या आशा पल्लवित होणार? हा प्रश्न किनवटभर चर्चेचा विषय ठरला आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता यांसारख्या स्थानिक समस्यांवर मतदारांनी ठोस भूमिका घेतल्याचे दिसून आले.

सोशल मीडियावरही निवडणुकीची जोरदार चुरस

दिवसभर सोशल मीडियावर उमेदवार व कार्यकर्त्यांची अफाट सक्रियता पाहायला मिळाली. मतदानाचे फोटो, आवाहने आणि आकडेवारी यामुळे किनवटचा डिजिटल कट्टा राजकीय चर्चांनी गजबजलेला होता.

रसदीवर ‘डल्ला’ मारल्याच्या चर्चांना उधाण

नगरपरिषद निवडणुकीसाठी आलेल्या रसदीवर काही नेते व पदाधिकाऱ्यांनी हात मारल्याच्या चर्चांनी शहरात जोर धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तालुका अध्यक्ष बाळू पवार दिग्रसकर यांनी समाजमाध्यमावर टाकलेल्या व्हिडिओत काही नेते-पदाधिकाऱ्यांना ‘चिंधीचोर’ अशी उपमा दिल्यानंतर चहा-टपरी व कट्ट्यांवर या ‘चिंधीचोर’ नेमके कोण? याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

निकालाकडे संपूर्ण किनवटचे लक्ष

मतदान शांततेत पार पडले असले तरी वाढलेल्या मतदानामुळे निकाल अनपेक्षित येण्याची शक्यता आहे. राजकीय समीकरणे बदलल्याची लक्षणे दिसत असल्याने यंदाचा निकाल अत्यंत चुरशीचा ठरणार, अशी सर्वसाधारण चर्चा सुरु आहे.



Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp