किनवट : किनवट ते गोकुंदा जोडणारा मुख्य मार्ग म्हणून हबीब कॉलनी–दत्तनगर रस्त्याचा वापर हजारो नागरिक, दुचाकीस्वार आणि विद्यार्थ्यांकडून दररोज केला जातो. मात्र या महत्त्वाच्या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे. रस्त्याला जागोजागी खोल खड्डे पडले असून नाल्याचे पाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याने दुचाकीस्वारांना खड्डे दिसत नाहीत. परिणामी,
दिवसातून दोन ते चार अपघात होणे ही नित्याचीच बाब बनली आहे.या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड दुर्गंधीसह असुरक्षित प्रवासाचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या मते, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून या रस्त्याकडे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष हा गंभीर प्रश्न बनला आहे. स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी निवेदने सादर करून तसेच आंदोलन करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत असून एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे, तत्काळ दुरुस्ती करून होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.