नांदेड : जिल्ह्यातील १३ नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर होताच जिल्ह्यातील स्थानिक राजकारणाचे स्पष्ट चित्र समोर आले आहे. नगराध्यक्ष व नगरसेवक पदांवर विविध पक्षांनी आपले वर्चस्व सिद्ध केले असून, काही ठिकाणी एकतर्फी सत्ता तर काही नगर परिषदांमध्ये संमिश्र राजकीय समीकरणे पाहायला मिळत आहेत.
देगलूर नगर परिषदेत नगराध्यक्ष व बहुसंख्य सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व इंडियन नॅशनल काँग्रेस यांच्याकडे गेले असून, एकूण २७ सदस्यीय सभेत या आघाडीचे वर्चस्व दिसून आले.
कुंडलवाडी येथे नगराध्यक्षपद भारतीय जनता पार्टी कडे गेले असले तरी सदस्यांमध्ये भाजपसह राष्ट्रवादी, काँग्रेस, अपक्ष व मराठवाडा जनहित पार्टी यांचा समावेश असल्याने संमिश्र सत्ता स्थापन झाली आहे.
धर्माबाद आणि बिलोली नगर परिषदेत मराठवाडा जनहित पार्टीने जोरदार कामगिरी करत नगराध्यक्षपदासह बहुसंख्य सदस्य जिंकले आहेत, तर भोकर, मुदखेड व मुखेड येथे भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे वर्चस्व दिसून आले.
लोहा, उमरी आणि किनवट नगर परिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना (उबाठा) यांना महत्त्वाचे यश मिळाले. विशेषतः किनवट नगर परिषदेत नगराध्यक्षपद शिवसेना (उबाठा) कडे गेले असून, २१ सदस्यीय सभेत राष्ट्रवादी (दोन्ही गट), भाजप, शिवसेना (शिंदे) व अपक्ष यांचे प्रतिनिधित्व आहे.
हिमायतनगर व हदगाव नगर परिषदांमध्ये काँग्रेस, भाजप व शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये सत्ता विभागली गेली असून, स्थानिक पातळीवर आघाडी-युतीचे राजकारण अधिक सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकूणच, नांदेड जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांनी कोणत्याही एका पक्षाचे संपूर्ण वर्चस्व न राहता बहुपक्षीय व संमिश्र राजकीय चित्र समोर आणले आहे. येत्या काळात या नगर परिषदांमध्ये विकासकामांसाठी कोणते राजकीय समीकरण आकाराला येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.