नवी दिल्ली : देशातील लोकशाही व्यवस्थेला धक्का देणाऱ्या कथित मतचोरी, मतदार याद्यांतील मनमानी कपात आणि निवडणूक प्रक्रियेत होत असलेल्या गैरप्रकारांविरोधात अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या वतीने १४ डिसेंबर २०२५ रोजी ‘वोट चोर, गादी सोडा’ ही भव्य महा रॅली आयोजित करण्यात आली आहे.
नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर दुपारी १ वाजल्यापासून होणाऱ्या या ऐतिहासिक रॅलीस काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी मार्गदर्शन करणार आहेत. देशभरातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार, प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी होणार आहेत.
काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मतदार याद्यांमध्ये होत असलेले लक्ष्यित वगळणे, SIR सारख्या प्रक्रियांचा गैरवापर आणि लोकशाही मूल्यांवर होणारे आघात हे भारतीय संविधानासाठी गंभीर धोका आहेत. याविरोधात जनतेला जागरूक करण्यासाठी ही महा रॅली आयोजित करण्यात येत आहे.
रॅलीपूर्वी दुपारी १ वाजता इंदिरा भवन येथे भोजनाचे आयोजन असून त्यानंतर सर्व नेते आणि कार्यकर्ते एकत्र बसद्वारे रामलीला मैदानाकडे प्रस्थान करणार आहेत.
लोकशाहीतील मतदानाचा अधिकार आणि मताची पवित्रता जपण्यासाठी ही लढाई असल्याचे नमूद करत, काँग्रेस नेतृत्वाने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या महा रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.