उपजिल्हा रुग्णालयाला ‘रेफर’चा आजार; गैरसोयींमुळे रुग्णांचे हाल

किनवट : आदिवासीबहुल किनवट तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात मूलभूत वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. आवश्यक तज्ज्ञ सेवा उपलब्ध नसल्याने रुग्णालयाला जणू ‘रेफर करण्याचा आजार’ जडला असून रुग्णांना आदिलाबाद, यवतमाळ व नांदेड येथे पाठविण्याशिवाय पर्याय उरत नाही.

रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन उपलब्ध असतानाही तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे त्याचा उपयोग होत नाही. परिणामी गंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असून यामुळे गोरगरीब रुग्णांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे.



गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात एकूण १३ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर असताना सध्या केवळ १० डॉक्टर कार्यरत आहेत. उर्वरित तीन डॉक्टर अन्यत्र प्रतिनियुक्तीवर आहेत. याशिवाय तीन कक्षसेवकही प्रतिनियुक्तीवर असल्याने रुग्णसेवेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

डोळ्यांच्या तपासणी व शस्त्रक्रियेची सुविधा नसल्यामुळे अनेक वृद्ध रुग्णांना नांदेड, आदिलाबाद व यवतमाळ येथे जावे लागत आहे. रक्तपेढी अस्तित्वात असली तरी पुरेशा रक्तसाठ्याअभावी रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ वाढली आहे. तसेच औषध निर्माण अधिकाऱ्यांची पदे अपुरी भरल्याने औषध वितरणातही अडचणी येत आहेत.

रुग्णालयाच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी सुमारे १५ वर्षांपूर्वी रुग्णकल्याण समितीची स्थापना करण्यात आली होती. मात्र तेव्हापासून तीच समिती कार्यरत असून कोणतेही नवे बदल किंवा सुधारणा झालेल्या नाहीत, अशीही नाराजी व्यक्त होत आहे.

नांदेड मुख्यालयापासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या या उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयींकडे आरोग्य विभागाने तातडीने लक्ष द्यावे. पुरेशा वैद्यकीय सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी नागरिक व रुग्णांकडून होत आहे.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp